मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली,चार तास वाहतूक ठप्प 

सुनील पाटकर
गुरुवार, 5 जुलै 2018

महाड (रायगड) : मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ केंबुर्ली येथे पहाटे साडेपाच वाजता दरड कोसळल्याने महामार्गावरील दोन्ही बाजू कडील वाहतूक चार तास ठप्प झाली होती.दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असुन एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. पावसाळ्यात महामार्ग धोक्याचा असल्याची व या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्याता सकाळने बातमीतून वर्तवली होती.

महाड तालुक्यात दोन दिवस पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर केंबूर्ली गावाच्या हद्दीत असलेल्या एका डोंगरावरील मातीचा भराव मोठ्या प्रमाणात महामार्गावर आला. यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक ठप्प झाली. दोन्ही दिशेला वाहनांची रांग लागली. या ठप्प झालेल्या वाहतुकीत मुंबई दिशेला जाणारी आणि मुंबई कडून कोकणात जाणारी वाहतूक बंद पडली होती. यामध्ये मुंबईला जाणाऱ्या चार रुग्णवाहिका देखील अडकल्याने रुग्णांचे हाल झाले. 

मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण काम सुरु आहे. याकरिता माणगाव ते कशेडी यादरम्यान विविध ठिकाणी खोदकाम केले आहे. दासगाव, केंबूर्ली,नडगाव या ठिकाणी असलेल्या डोंगरात खोदकाम केले आहे. पावसाळ्यात याठिकाणी दरड येण्याची शक्यता सकाळने वर्तवली होती. याठिकाणी खोदकाम केल्याने दोन दिवस पडणाऱ्या पावसाने वरील भागात पाणी मुरून मातीचा सुटलेला भाग आज पहाटे खाली आला. ज्या ठिकाणी दरड आली त्या ठिकाणी एका बाजूला सावित्री नदीचे पात्र तर दुसरीकडे डोंगर असल्याने पूर्ण महामार्ग बंद पडला. यामुळे सकाळी जाणाऱ्या एस.टी.च्या गाड्या, खाजगी वाहने तर चार रुग्णवाहिका अडकून पडल्या.

दूध,खाद्यपदार्थ,वृत्तपत्र व भाज्यांची वाहने अडकल्याने अनेकांची गौरसोय झाली. त्यानंतर आलेल्या यंत्रासामुग्रच्या सहाय्याने एका बाजूकडील माती हटवण्याचे काम केल्यानंतर तब्बल चार तासांनंतर येथील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.सद्या एकेरी वाहतूक सुरु असुन या ठिकाणी दरड येण्याची शक्याता अजून कायम आहे.

Web Title: traffic jam on mumbai goa high way for four hours due to landslide