गडनदीच्या नव्या पुलावरून वाहतुक सुरू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 मार्च 2019

कणकवली - मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने ठेवले आहे. आता या महामार्गाच्या चौपदरीकरणातील महत्वाच्या पुलांचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे.

कणकवली - मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने ठेवले आहे. आता या महामार्गाच्या चौपदरीकरणातील महत्वाच्या पुलांचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे.

कणकवली शहरातील गडनदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून छोट्या गाड्यांची वाहतूक सुरू झाली आहे. लवकरच सर्वच वाहतुक या पुलावरून वळवून दुसऱ्या पुलाचे कामही सुरू केले जाणार आहे; मात्र शहरातील फ्लायओव्हर ब्रीजचे काम मंदगतीने सुरू असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला गेल्या वर्षीपासून सुरूवात झाली. या महामार्गाच्या कणकवली ते झारापर्यंत आणि खारेपाटणपर्यंत दोन वेगवेगळ्या कंपनींना ठेका देण्यात आला आहे. कणकवली शहरातून जाणाऱ्या महामार्गावर ओव्हरब्रीज आणि कुडाळ शहरात ओव्हरब्रीजचे काम वेगाने सुरू आहे. कणकवलीचे ओव्हरब्रीज 1260 मीटर लांबीचे आहे. या ब्रिजच्याखाली 6 मीटर सर्व्हीसरोडचे सुरू आहे.

याचबरोबर गडनदी पुलाचे कामही गेल्या वर्षभरात हाती घेण्यात आले. आता हे पूल पूर्ण झाले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला भराव टाकण्यात आला आहे. वागदे आणि कणकवली हा राष्ट्रीय महामार्ग नव्या पुलाला जोडण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसापासून छोटी वाहने या पुलावरून धावत आहेत. लवकरच मोठ्या वाहनांसाठीही या पुलावरचा मार्ग खुला होणार आहे.

गेल्या वर्षभरात राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाहणी करून महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेतला होता; मात्र सप्टेंबरपासून त्यांनी या महामार्गाच्या प्रगतीकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे काही भागात महामार्गाचे काम मंदगतीने सुरू आहे. येत्या मार्च 2020 मध्ये चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्याची डेडलाईन आहे.

सुमारे 471 किमी चौपदरीकरणाचा हा प्रकल्प आहे. पनवेल ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील 84 किलोमीटरच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला सात वर्षाचा कालावधी लागला. आता सिंधुदुर्गातील खारेपाटण ते झारापपर्यंतच्या चौपदरी करणाचे काम वेगाने सुरु आहे. बहुतांशी नदीनाल्यांवरील पुलाची कामे अंतिम टप्प्यात आहेत. या महामार्गावरील ब्रिटीशकालीन असलेले गडनदीवरील पुल चौपदरीकरणासाठी तयार करण्यात आले आहेत. यातील एका पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच वाहतुकीला खुले होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transportation on Gad river new bridge starts