ट्रक टर्मिनसचे आरक्षण कमी करण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

रत्नागिरी - ""शहरातील साळवी स्टॉप येथील ट्रक टर्मिनसचे आरक्षित क्षेत्र कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्याअनुषंगाने बुधवारी (ता. 21) सर्वसाधारण सभेमध्ये ठराव घेण्यात येणार आहे. शिवसेनेने याबाबत सदस्यांना व्हीप (पक्षादेश) बजावावा. आरक्षणाचे पूर्ण क्षेत्र देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. तसे झाले नाही तर कायदेशीर बाजू लढण्यासाठी न्यायालयात जाऊ,'' असा इशारा जिल्हा मोटारमालक असोसिएशन, रत्नागिरी तालुका हमाल पंचायत आणि माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी दिला.

येथील हॉटेल विवेकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी नगरसेवक विकास पाटील, रोशन फाळके, वसंत पाटील आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, ""शहरामध्ये दुपारीच ट्रक व अन्य मोठ्या वाहनांना प्रवेश दिला जातो. उर्वरित वेळेत या वाहनांना पार्किंगची व्यवस्था नाही. शहरातील नाचणे म्युनिसिपल हद्दीमध्ये 200 गुंठे क्षेत्रावर शहर विकास आराखड्यातील (मंजूर योजनेतील) आरक्षण क्र. 117 हे ट्रक टर्मिनस म्हणून मंजूर झाले आहे, परंतु नगररचना कोकण विभागाच्या सहसंचालकांकडे हे आरक्षण उठविण्याबात अर्ज दाखल झाला; परंतु हे आरक्षण विकसित करण्यासाठी नव्या नियमानुसार संचालकांनी येथील मुख्याधिकाऱ्यांना आवश्‍यक ती कार्यवाही करण्यासाठी आणि त्याला मंजुरी देण्यासाठी हा विषय सर्वसाधारण सभेत ठेवला; मात्र नव्या तरतुदीचा फायदा घेऊन आरक्षण असलेल्यापैकी 50 टक्के जमीन मूळ मालकाला परत देण्याचा घाट घातला आहे. तसे झाल्यास ट्रक पार्किंगचा मोठा प्रश्‍न निर्माण होणार आहे. वाहतूक कोंडी होऊन, अपघात होण्याची शक्‍यता असते. यामुळेच दुपारच्या वेळी शहरामध्ये या मोठ्या वाहनांना प्रवेश दिला जातो.''

जिल्हा मोटारमालक असोसिएशन, तालुका हमाल पंचायत या संघटनांसह माजी नगराध्यक्ष कीर यांनी याबाबत पालिकेला पत्र दिले आहे. 200 गुंठे आरक्षित जागा हीच कमी असताना त्यातील 50 टक्के जागा कमी करण्यात येत आहे. उद्याच्या 21 तारखेला याबाबत सर्वसाधारण सभेमध्ये हा ठराव घेतला आहे. शिवसेनेने यापूर्वी या ठरावाला विरोध केला आहे. आता पुन्हा यामध्ये काही काळेबेरे झाल्यास तो ठराव मागे पडू शकतो. त्यामुळे शिवसेनेने सदस्यांना व्हीप बजावून ट्रक टर्मिनससाठी सर्व जागा आरक्षित करण्यात यावी, ठरावाच्या बाजूने उभे राहावे. अन्यथा सेनेबाबत शहरामध्ये वाईट संदेश जाईल. तसे झाले नाहीतर आम्ही न्यायालयात जाऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी जिल्हा मोटारमालक असोसिएशनचे उपाध्यक्ष बंड्या साळवी यांच्याविरोधातील खदखद दिसून आली.

Web Title: Truck Terminus try to reduce reservation