
चिपळूण (रत्नागिरी) : तवसाळ (ता. गुहागर) येथील समुद्र किनार्यावर तब्बल 6 वर्षानंतर 151 कासवांची अंडी आढळून आली. येथील वन विभागाच्या कर्मचार्यांनी ते संरक्षित केले आहे. 45 दिवसानंतर अंडीमधून पिल्ले बाहेर येतील त्यानंतर त्यांना समुद्रात सुरक्षितपणे सोडले जाणार आहे.
तवसाळच्या समुद्र किनार्यावर सहा वर्षापूर्वी कासव अंडी घालत होते. मात्र गेली सहा वर्ष कासवांनी अंडी घातल्याचे आढळून आले नाही. याबाबत सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष भाऊ काटदरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, तवसाळच्या समुद्र किनार्यावर मादी कासव अंडी घालण्यासाठी आली असेल परंतू तिला अडथळा किंवा धोका निर्माण झाल्यामुळे ती समुद्र किनार्यावर येत नसावी. किंवा कासव अंडी घालून निघून गेली असेल पण ही प्रक्रिया कोणाच्याही लक्षात आली नसेल. मात्र सहा वर्षानंतर प्रथमच तवसाळच्या समुद्र किनार्यावर कासवांची अंडी सापडली ही बाब आनंदी आहे. कासव संरक्षण मोहीमेला बळ देणारी आहे.
वनरक्षक रामदास खोत म्हणाले, ऑलिव्ह रिडले’ ही प्रजाती कोकण किनारी आढळते. या प्रजातीतील कासवे दुर्मिळ होऊ लागल्याने तिच्या बचावासाठी कोकणात मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. कांदळवण सह व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश सुर्वे, सचिव एस. व्ही. परशेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली कासव संरक्षण मोहीम सुरू आहे. तवसाळमधील समुद्राच्या वाळूचे विशिष्ट तपमान या कासवांची अंडी उबविण्यासाठी मानवते. त्यामुळे मादी कासव किनार्यालगत प्रजननासाठी येतात. सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते मार्च हा या कासवांचा विणीचा हंगाम असतो.
या प्रजातीच्या मादी कासवाने तवसाळ येथील किनार्याच्या वाळूमध्ये सर्वांत उंच लाटांच्या पातळीपासून 50 ते 100 फूट अंतरात एक ते दीड फूट खोलीचा खड्डा खोदून त्यामध्ये 151 अंडी घातल्याचे आढळून आले. त्यानंतर एस. टी तेली यांच्या मदतीने आम्ही ही अंडी संरक्षित केली आहे. अंड्याभोवती हॅचरी उभारण्यात आली आहे. 40 ते 45 दिवसानंतर पिल्ले बाहेर येतील. त्यानंतर त्यांना सुरक्षितपणे समुद्रात सोडली जाणार आहेत. हंगामी कामगारांच्या मदतीने महेश सुर्वे हॅचरीवर लक्ष ठेवून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.