बिबट्याचे नख कारवाई दरम्यान सापडले संशयिताच्या घरात

Two Arrested In Leopard Skin Sale Case In Vaibhavwadi
Two Arrested In Leopard Skin Sale Case In Vaibhavwadi

वैभववाडी ( सिंधुदुर्ग ) : बिबट्याचे कातडे विक्री प्रकरणी आचिर्णे आणि खांबाळे येथील आणखी दोघांच्या मुसक्‍या वनविभागाने आवळल्या. या संशयितांपैकी एकाच्या घरात बिबट्याचे नख सापडले असुन दोन्ही संशयितांनी गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली आहे. त्यामुळे दोन्ही संशयितांना चौकशीसाठी येऊर (जि. ठाणे) येथे नेण्यात येत असल्याची माहिती कणकवली वनक्षेत्रपाल सर्जेराव सोनवडेकर यांनी येथे दिली.

बिबट्यांची कातडे विक्री करण्यासाठी गेलेल्या नरेंद्र गुरव आणि अजित मराठे या दोघांना ठाणे वनविभागाने अटक केली होती. त्यानंतर वनविभागाने चौकशी सुरू केली होती. आज वनविभागाने सीताराम बाबू काळे (वय 26, रा. आचिर्णे सिध्दाचीवाडी) व जनार्दन धाकू शेळके (वय 35, रा. खांबाळे-गेळये) या दोघांना अटक केली.

नरेंद्र गुरव याच्या घराची झडती

गेले दोन दिवस ठाण्याहून आलेले वनपाल रमाकांत मोरे (नागल), राजन खरात (येऊर) व वनरक्षक संजय साबळे(येऊर) यांच्या पथकाने वनक्षेत्रपाल सर्जेराव सोनवडेकर यांना माहिती दिल्यानंतर उपवन संरक्षक समाधान चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सोनवडेकर, वनपाल एस. एस. वागरे, वनरक्षक पी. डी. पाटील ए. एच. काकतीकर, किरण पाटील यांनी कातडे विक्रीसाठी ठाण्याला गेलेल्या नरेंद्र गुरव याच्या घराची बुधवारी झडती घेतली.

बिबट्याचे एक नख लागले हाती

त्यांच्याकडुन मिळालेल्या माहीतीनुसार सायंकाळी संशयित सीताराम काळे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर आज पहाटे काळे याला पुन्हा ताब्यात घेऊन त्याच्या घराची झडती घेतली. तेव्हा बिबट्याचे एक नख हाती लागले; परंतु ते नख या प्रकरणातील नसल्याचे निष्पन्न झाले आहे. सीताराम काळे याच्या जबाबावरुन खांबाळे-गेळयेतील जनार्दन शेळके याला ताब्यात घेण्यात आले. सीताराम व जनार्दन यांनी गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली आहे. संशयितांनी गुन्हा कबूल केल्यामुळे पुढील चौकशीसाठी दोघांनाही येऊर येथे नेण्यात येणार असून त्यांना ठाण्याहून आलेल्या वनाधिकाऱ्यांच्या ताब्यात दिल्याचे सोनवडेकर यांनी स्पष्ट केले. या गुन्ह्यात वन्यजीव अधिनियम 1972 अंतर्गत 3 ते 7 वर्षे शिक्षेची तरतूद असून या प्रकरणाचा तपास वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार करीत आहेत.

चार लाख किंमतीला विक्री

नरेंद्र गुरव आणि अजित मराठे यांच्या ताब्यात सापडलेल्या बिबट्याच्या कातड्याची विक्री चार लाख रुपयाला होणार होती. मिळणाऱ्या रक्कमेपैकी जनार्दन शेळके व सीताराम काळे यांना प्रत्येकी एक लाख द्यायचे आणि नरेंद्र गुरव याने उर्वरित दोन लाख घ्यायचे असे त्यांच्यात ठरले होते, अशी माहिती संशयितांकडून उघड झाल्याचे वनाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

शिकारी अजुनही अस्पष्ट

बिबट्याचे कातडे जनार्दन शेळके याला मिळाले होते. त्याने ते सीताराम काळे याला दिले. त्याने ते कातडे विक्रीसाठी नरेंद्र गुरव याला दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे; परंतु ते कातडे जनार्दन शेळके याच्याकडे आले कुठून? बिबट्याची शिकार नेमकी कोणी व कुठे केली हे अजुनही अस्पष्टच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com