रत्नागिरी पर्यटन महोत्सवात दोन कोटींची उलाढाल

शिरीष दामले
मंगळवार, 23 मे 2017

खाण्याचे स्टॉल, हॉटेल्स, रेस्टॉरंट, हातगाड्या अशा साऱ्यांना या काळात व्यवसाय मिळाला हे निश्‍चित. पर्यटक निवांतपणे जेवणासाठी मोठ्या हॉटेलांमध्ये जातो. अशा वेगवेगळ्या ग्राहकांचा फायदा साऱ्यांना मिळाला. कार्यक्रमानिमित्त बाहेर पडलेल्यांची पावले हॉटेलकडे वळली. पर्यटक सर्वच होते, असे म्हणणे जरा कठीणच आहे; मात्र आमचा व्यवसाय ५० टक्‍क्‍यांनी जास्त झाला.

- उदयशेठ लोध, संचालक, कार्निव्हल

रत्नागिरी - शहरात एकाच वेळी झालेल्या दोन पर्यटन महोत्सवांचे यश-अपयश किती याबाबत कवित्व सुरू होते; मात्र यानिमित्ताने आर्थिक उलाढाल किती झाली, हा महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षिला गेला. पर्यटक किती आले आणि रत्नागिरीच्या पर्यटनाला नवीन आयाम मिळाले का, याचाही ऊहापोह झाला नाही. या तीन मुद्द्यांची उत्तरे ठामपणे होय, अशी देता येतात. पर्यटन महोत्सवाच्या काळातील तीन दिवसांत शहरामध्ये सुमारे दोन कोटी रुपयांची उलाढाल झाली.

पर्यटन महोत्सव हा अधिकाधिक पर्यटक रत्नागिरीकडे वळण्यासाठी आणि तो अधिक काळ येथे राहण्यासाठी भरवला पाहिजे. त्याचबरोबर त्याचा आर्थिक फायदा स्थानिकांना मिळण्याची अपेक्षा आहे. सर्वसाधारण ११ हजार पर्यटक या काळात रत्नागिरीत दाखल झाले होते. शहरात येण्याच्या भाट्ये ब्रीज, पालकर हॉस्पिटल व टीआरपी पूल या तीन रस्त्यांवर असलेल्या चमूने याची नोंद केली आहे. शहरालगतच्या भाट्ये किनाऱ्यावर झालेली गर्दी आणि त्याचा थेट परिणाम तेथील स्थानिक व्यावसायिकांनी अनुभवला. त्यांच्या व्यवसायात या दिवसात ५० टक्‍क्‍यांची वाढ झाली होती. रिक्षा व्यवसायालाही चांगल्यापैकी बरकत आली. शहरातील पर्यटनस्थळे व प्रामुख्याने किनारे येथे अधिक भाडी मिळाली. ३० ते ४० टक्‍क्‍यांनी व्यवसायात वाढ झाली. स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिराला नेहमीपेक्षा अधिक भाविकांनी भेट दिल्याचा अनुभवही तेथील व्यवस्थापकांनी सांगितला. शहरातील काही हॉटेल व्यावसायिकांकडे एवढी गर्दी झाली, की ते सर्वांना सेवा देऊ शकले नाहीत.

याबाबत जाणकारांकडून आकडेवारीच देण्यात आली. ११ हजार पर्यटकांपैकी ३० ते ३५ टक्के पर्यटक परतले असतील, तर ६५०० पर्यटक राहिले. दररोज २२०० पर्यटक राहिले. प्रत्येकाने दिवसाला १५०० रुपये खर्च केल्याचे धरले, तर दिवसाला ३३ लाख याप्रमाणे १ कोटी रुपये पर्यटकांनी खर्च केले. ३ दिवसांत ३० हजार नागरिक घराबाहेर पडले.

 त्यांनी विविध कार्यक्रम व भटकंतीवर ३० लाख खर्च केले. करमणुकीचे कार्यक्रम आणि इतर बाबींसाठी सुमारे तीस ते चाळीस हजार नागरिक तीन दिवसांत भटकंतीला बाहेर पडले. त्यातून बाजारात ४० लाखांची उलाढाल झाली. महोत्सवानिमित्त तीस लाखांचा खर्च झाला, असे सुमारे १ कोटी ७० लाख रुपये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या झालेला खर्च लक्षात घेता या तीन दिवसांत उलाढाल दोन कोटींवर गेली.

Web Title: Two crore turnover in Ratnagiri Tourism Festival