रत्नागिरी : किरडुवे येथे विहिरीत बुडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 September 2019

  • घराशेजारील विहिरीत पोहण्यासाठी उतरलेल्या दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
  • आज दुपारी किरडुवे येथे घटना.
  • स्वप्नील अनंत पांचाळ (34), संजय काशिराम बाईत (40, दोघेही रा. किरडुवे) अशी मृतांची नावे. 

देवरुख - घराशेजारील विहिरीत पोहण्यासाठी उतरलेल्या दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी नजीकच्या किरडुवे येथे घडली. स्वप्नील अनंत पांचाळ (34), संजय काशिराम बाईत (40, दोघेही रा. किरडुवे) अशी मृतांची नावे आहेत. यातील स्वप्नील प्रथम बुडाला व त्याला शोधण्यासाठी गेलेला संजयचाही विहिरीत बुडून मृत्यू झाला.

याबाबत देवरुख पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्नील अनंत पांचाळ हा कामानिमित्त मुंबईत असतो. गणेशोत्सवासाठी तो गावी आला होता. आज दुपारी तो घराशेजारील विहिरीत पोहण्यासाठी उतरला होता. विहिरीत उतरलेला स्वप्नील दिसत नसल्याने संजय काशिराम बाईत याने त्याला शोधायला विहिरीत उडी घेतली. दोन वेळा वर आल्यावर स्वप्नील दिसला नाही म्हणून त्याने पुन्हा पाण्यात बुडी मारली. मात्र तोही परत वर आला नाही.

घटनेची माहिती समजताच आजूबाजूचे ग्रामस्थ विहिरीजवळ जमले. त्यातील काहींनी पाण्यात उड्या मारल्या. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. बराचवेळ शोधल्यावर दोघांनाही निपचिप अवस्थेत वर काढण्यात आले. त्यांना तातडीने देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. 

गावातील दोन युवकांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने किरडुवे गावावर शोककळा पसरली आहे. यातील स्वप्नील याच्या पश्‍चात आई, पत्नी, मुले असा परिवार आहे. तर संजय याच्या पश्‍चात आई, 2 मुलगे, मुलगी आहे. दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन संगमेश्‍वर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. या प्रकरणी हे. का. डी. एस. बाणे अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two dead in well in Kirduve Ratnagiri