कोकणच्या पोरी हुशारच ; दहावीत दोघींनी मिळविले शंभर टक्के गुण 

मकरंद पटवर्धन 
बुधवार, 29 जुलै 2020

काटेकोर अभ्यास करत, वेळापत्रक बनवून नियमित अभ्यास करून दहावीत चक्क शंभर टक्के गुण मिळवले.

रत्नागिरी - रत्नागिरीतील दोघी विद्यार्थिनींनी काटेकोर अभ्यास करत, वेळापत्रक बनवून नियमित अभ्यास करून दहावीत चक्क शंभर टक्के गुण मिळवले. अर्थातच त्यांच्या गुणांना त्यांच्या नृत्यकलेची जोड मिळाली आणि 500 गुणांचा आकडा गाठता आला. फाटक हायस्कूलमधील गिरीजा शैलेश आंबर्डेकर आणि गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील (जीजीपीएस) दीक्षा महेश परशराम या दोघींनी ही किमया साधली आहे. या दोघींच्या अभूतपूर्व यशाबद्दल शाळेकडून कौतुक करण्यात येत आहे.

गिरीजाने 491 गुण मिळवले व भरतनाट्यम नृत्यकलेचे 9 गुण मिळवून 500 गुण संपादन केले. गिरीजाने परीक्षेपुरता अभ्यास न करता वर्षभर रोजचा अभ्यास आणि ठराविक नियोजन करून, वेळापत्रक बनवले होते. तिला चौथी, आठवीमध्ये शिष्यवृत्ती मिळाली होती. शिवाय नृत्यगुरु मिताली भिडे यांच्याकडे भरतनाट्यमचे क्लासही सुरू होते. शंभर टक्के मिळतील, असे वाटले नव्हते. परंतु या गुणांनी खूप आनंद झाला. शिक्षक, आई-वडील, आजी-आजोबांचे मार्गदर्शन मिळाले. आता विज्ञान शाखेतून पुढे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार आहे. गिरीजाचे वडील कोकण रेल्वेत अधिकारी असून आई गृहिणी आहे. घरातून मिळालेल्या प्रोत्साहनामुळेच हे यश मिळवल्याचे गिरीजाने सांगितले. 

हे पण वाचा - दहावीच्या निकालत यंदाही कोकण अव्वलच ; मुलींनी मारली बाजी...  

दीक्षा परशरामने शंभर टक्के गुण मिळवत जीजीपीएसमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. जीजीपीएसच्या बाबुराव जोशी गुरुकुलमध्ये ती दहावीत शिकत होती. शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन व दीक्षाने घेतलेली मेहनत यामुळे हे यश मिळाल्याचे तिच्या पालकांनी सांगितले. इयत्ता आठवीमध्ये तिला शिष्यवृत्ती मिळाली होती. आता ती विज्ञान शाखेत प्रवेश घेणार असून अभियंता होणार आहे. त्यानंतर पुढे एअरफोर्समध्ये भरती होण्याची तिची इच्छा आहे. श्री. परशराम हे औषध कंपनीमध्ये मॅनेजर असून आई गृहिणी आहे.  

संपादन - धनाजी सुर्वे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two girls scored 100 percent marks in the 10th standard examination at ratnagiri