लग्नाच्या दिवशीच दोन गटांत हाणामारी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

खेड - हळदीच्या कार्यक्रमात लावलेल्या डीजेच्या आवाजावरून दोन गटांत आज झालेल्या हाणामारीत एका युवतीसह 13 जण जखमी झाले. तालुक्‍यातील पन्हाळजे-बलदेववाडी येथे विवाह सोहळ्यादिवशीच हा प्रकार घडला. खेड पोलिसांनी दोन्ही गटांतील 25 जणांना गुन्हे दाखल करत अटक केली आहे. दरम्यान, विवाह सोहळा मुहूर्तावर पार पडला. 

खेड - हळदीच्या कार्यक्रमात लावलेल्या डीजेच्या आवाजावरून दोन गटांत आज झालेल्या हाणामारीत एका युवतीसह 13 जण जखमी झाले. तालुक्‍यातील पन्हाळजे-बलदेववाडी येथे विवाह सोहळ्यादिवशीच हा प्रकार घडला. खेड पोलिसांनी दोन्ही गटांतील 25 जणांना गुन्हे दाखल करत अटक केली आहे. दरम्यान, विवाह सोहळा मुहूर्तावर पार पडला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पन्हाळजे-बलदेववाडी येथे शंकर मिसाळ यांच्या मुलीचे आज सकाळी सव्वाअकरा वाजता लग्न होते. यानिमित्त मंगळवारी (ता. 18) मिसाळ यांच्या घरी हळदीचा कार्यक्रम होता. रात्री उशिरापर्यंत डीजे सुरू होता. त्याचा आवाज कमी करावा, अशी विनंती यजमान मिसाळ यांना त्यांच्या भावकीतील एका गटाने केली; परंतु डीजेच्या तालावर नाचणाऱ्या युवकांना त्याचा राग आल्याने दोन्ही गटांत किरकोळ वादावादी झाली. गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी वेळीच मध्यस्थी केली. त्यामुळे दोन गटांतील हा वाद तात्पुरता मिटला; परंतु डीजेचा आवाज कमी करावा, अशी विनंती करणाऱ्या गटातील काही जणांनी मुंबईतील नातेवाइकांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली व त्यांना रातोरात बलदेववाडी येथे बोलावून घेतले. त्यानुसार काही जण आज सकाळी साडेसातच्या सुमारास मुंबईतून बलदेववाडी येथे आले. त्यांनी शंकर मिसाळ व त्यांच्या नातेवाइकांवर लाठ्या-काठ्या घेऊन हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे शंकर मिसाळ व त्यांचे नातेवाईक सुरवातीला भांबावले; मात्र नेमके काय घडतेय, हे लक्षात येताच त्यांनीही प्रतिहल्ला चढवला. यामध्ये एका युवतीसह दोन्ही गटांतील 13 जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये सहदेव गंगाराम नाचरे, महादेव सोनू बुरटे, गंगाराम ल. नाचरे, बाबाजी सोनू जाधव, मारुती गंगाराम जाधव, लक्ष्मण शंकर मिसाळ, गुणाजी हरी नाचरे, सुनील बाबू भोसले, पांडुरंग भिकू कानीम, बबन शांताराम जाधव, शांताराम बाळाजी जाधव, राजाराम शांताराम जाधव व कीर्ती बाबू नाचरे यांचा समावेश आहे. 

याबाबत खेड पोलिस ठाण्यात परस्परांविरोधी तक्रारी दाखल झाल्या. हाणामारीत जखमी झालेल्यांवर कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटांतील जखमी झालेल्या तसेच त्यांच्या नातेवाइकांच्या जाबजबाब घेण्याचे काम सुरू होते. 

आठ जण मुंबईतून आले 
मुंबईत असलेले बाबाजी सोनू जाधव, राजेश बाबाजी जाधव, मारुती गंगाराम जाधव, सहदेव गंगाराम नाचरे, योगेश केशव जाधव, बाबाजी दत्ताराम नाचरे, महादेव सोनू बुरटे, गंगाराम लक्ष्मण नाचरे हे आठ जण बलदेववाडी येथे आज सकाळी आले व साडेसातच्या सुमारास या सर्वांनी शंकर मिसाळ व त्यांच्या नातेवाइकांवर हल्ला चढवला, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Web Title: Two groups clash wedding day