असगोलीत सापडले दोन दुर्मिळ फ्लाईंग फीश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

गुहागर - असगोली येथील मच्छीमारांना पंख असलेले दोन दुर्मिळ "फ्लाईंग फिश' आज सकाळी सापडले. समुद्रावर आलेल्या पर्यटकांना हा मासा दाखविल्यानंतर मच्छीमारांनी त्याला समुद्रात सोडून जीवदान दिले आहे. क्वचितच समुद्रात या प्रजातीचे उडणारे मासे आढळतात, असे मच्छीमारांनी "सकाळ'ला सांगितले.

गुहागर - असगोली येथील मच्छीमारांना पंख असलेले दोन दुर्मिळ "फ्लाईंग फिश' आज सकाळी सापडले. समुद्रावर आलेल्या पर्यटकांना हा मासा दाखविल्यानंतर मच्छीमारांनी त्याला समुद्रात सोडून जीवदान दिले आहे. क्वचितच समुद्रात या प्रजातीचे उडणारे मासे आढळतात, असे मच्छीमारांनी "सकाळ'ला सांगितले.

असगोली येथील जीवनाद नाटेकर, नितेश असगोलकर, ज्ञानेश्‍वर पावसकर, शैलेश नाटेकर, सिद्धेश तुळसुणकर व विनोद नाटेकर हे मच्छीमार बुधवारी पहाटे तीन वाजता "गंगाकृपा' ही होडी घेऊन मच्छीमारीसाठी गेले होते. रानवी ते असगोली या परिसरात समुद्रात मासेमारी करताना त्यांच्या जाळ्यात पंख असलेले दोन मासे सापडले. जाळे ओढल्यावर जिवंत असलेल्या या माशांना त्यांनी होडीतील पाण्यात ठेवून दिले होते. या माशांची लांबी सुमारे 1 फुट आहे. सकाळी 8.30 च्या सुमारास मासेमारी संपवून ते असगोलीला परतले. त्यावेळी असगोलीतील समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित असलेल्या पर्यटकांना त्यांनी पंख असलेले मासे दाखविले. त्यानंतर या माशांना समुद्रात सोडून जीवदान देण्यात आले. यासंदर्भात बोलताना ज्ञानेश्वर पावसकर म्हणाले की, समुद्रात मासेमारीला गेल्यावर क्वचित पाण्यावरुन उडताना असे मासे दिसतात. परंतु आजपर्यंत कधीच इतका मोठा फ्लायिंग फीश जाळ्यात सापडला नव्हता.

फ्लाईंग फिशच्या 40 प्रजाती
समुद्रामध्ये फ्लाईंग फीशच्या 40 प्रजाती सापडतात. त्याच्या पंखाना पेक्‍ट्रोल फीन्स असे म्हणतात. अटलांटिक महासागर, पॅसिफीक महासागर व अरबी समुद्रातील उबदार पाण्याच्या प्रवाहात हे मासे आढळतात. समुद्राच्या पाण्यात 60 किमी प्रती तास वेगाने हे मासे प्रवास करतात. तर समुद्राच्या पाण्यावर 4 फुट उंचीवर ते जाऊ शकतात. हवेतून 200 मीटरचे अंतर हा मासा उडू शकतो.

Web Title: Two rare Flying fish