
शिवसेनेची ताकद काय आहे हे पुन्हा एकदा विरोधकांना दाखवून देतील, असा ठाम आत्मविश्वास उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
रत्नागिरी : गोळप जिल्हा परिषद गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथील जनतेने नेहमीच प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. निष्ठावान शिवसैनिक ही आमची ताकद आहे. शिवसेना या चार अक्षरी महामंत्राने भारावलेला आमचा कडवट शिवसैनिक गोळप जिल्हा परिषद गटातील गोळप, कोळंबे आणि भाट्ये या तीनही ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवतील. शिवसेनेची ताकद काय आहे हे पुन्हा एकदा विरोधकांना दाखवून देतील, असा ठाम आत्मविश्वास उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील गोळप येथील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हा प्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, उपजिल्हा प्रमुख बाबू म्हाप, पंचायत समिती सभापती प्राजक्ता पाटील, जिल्हा परिषद सदस्या मानसी साळवी, उप तालुका प्रमुख राकेश साळवी, तांबे शेठ, तालुका युवा अधिकारी तुषार साळवी, मंगेश साळवी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा - आयुष्यभर आईच्या पदराला धरुन राहिला, जीवनाचा शेवटही आईसोबतच झाला ; माय-लेकरावर काळाचा घाला -
ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजल्यापासून तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा सरपंच असावा यासाठी उदय सामंत यांनी गट निहाय मेळावे सुरू आहे. उदय सामंत म्हणाले, गावागावांत विकास कामे शिवसेनेच्या माध्यमातून झाली आहेत. विरोधकांकडे प्रचारासाठी कोणताही ठोस मुद्दा नाही. ते आपल्याच कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करून राजकारण करण्याचा प्रयत्न करतील, त्यांचा ह प्रयत्न हाणून पाडा. कोरोनाच्या कठीण कालावधीत फक्त शिवसेना जनतेच्या उपयोगी पडली. सर्वसामान्य जनतेला फक्त शिवसेना आणि शिवसैनिकांनी मदत केली हे जनता विसरणार नाही. आपले प्रभाग निहाय शाखा प्रमूख आहेत. सर्वांनी दक्ष राहून प्रचार यंत्रणा राबवली तर विरोधकांचे अतित्व सुद्धा दिसणार नाही. उद्यापासून सुरू होणार्या शिवसेना सभासद नोंदणीच्या अभियानात इतकी सभासद नोंदणी करा की विरोधकांना ग्रामपंचायत निवडणुका लढवायचेही धाडस होता कामा नये.
पुढील 25 वर्षे ठाकरेच मुख्यमंत्री ः राऊत
विरोधकांना धूळ चारून गोळप जिल्हा परिषद गटातील तीनही ग्रामपंचायतींवर सेनेचा भगवा डौलाने फडकेल. हीच पाच वर्षे काय पुढची पंचवीस वर्षे उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील. तुम्ही तीनही ग्रामपंचायती बिनविरोध जिंका तुम्हाला विकास निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी यावेळी दिले.
हेही वाचा - दर्शनासाठी डोंगरमाथ्यावर गेले आणि पर्समधील सोळा तोळे गमावून आले -
संपादक - स्नेहल कदम