उदय सामंत यांनी `या` प्रकरणी दिलाय  इशारा  

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

मी जिल्हा पोलिस अधीक्षकांना याबाबत सूचना दिल्या असून विनाकारण बाजारात फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे हातावर शिक्के असलेले फिरताना दिसल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई करण्याच्या सूचना देणार आहोत.

ओरोस ( सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात येण्यासाठी बनावट ई पास देणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. 

मुंबईहून आलेले चाकरमानी बाजारामधून फिरताना दिसत आहेत. याविषयावर श्री. सामंत म्हणाले, ""मी जिल्हा पोलिस अधीक्षकांना याबाबत सूचना दिल्या असून विनाकारण बाजारात फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे हातावर शिक्के असलेले फिरताना दिसल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई करण्याच्या सूचना देणार आहोत. बनावट पासने जिल्ह्यात लोक येत आहेत हे खरे आहे; मात्र त्यांच्यावर काय कारवाई करणे याबाबत आपण उद्या (ता.1) मान्सून पूर्व बैठक घेणार आहोत; मात्र असे बनावट पास देणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असून येत्या दोन ते तीन दिवसात आपल्याला हे पाहायला मिळेल. मुळावरच घाव घालणे आवश्‍यक आहे आणि तेच आपण करणार. जिल्ह्यात मुंबईहून येत आहेत तेच पॉझिटिव्ह मिळत आहेत.'' 

ते म्हणाले, ""ज्यांच्याजवळ रेशनकार्ड नाही त्यांनाही धान्य देण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना केल्या आहेत. येत्या दोन दिवसात धान्य पुरवठा रेशन कार्ड नसलेल्या लोकांनाही केला जाणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील लोकांची मागणी असल्यास ग्रामीण भागातून एसटी सुरू करण्याच्या सूचना एसटी विभागाला दिलेल्या आहेत; मात्र लोक काळजी घेवून एसटीतून प्रवास करायला तयार नसल्याचे निदर्शनास येत आहे.'' 

जिल्ह्यात आढळणाऱ्या रुग्णांना ठेवण्यासाठी जिल्हा रुग्णालयात खास कोविड रुग्णालय बनवले आहे. यासाठी हे पुर्ण रुग्णालय वापरावे लागले तरी प्रशासनाची तयारी असून कुडाळ येथील महिला रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना आपण दिल्या असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्हा रुग्णालयातून पाठविण्यात येणारे नमूने गहाळ होत आहेत. त्यामुळे रुग्णांचे पुन्हा नमुने पाठवावे लागत आहेत. याबाबत आपण माहिती घेऊन असे प्रकार होत असतील तर तपासणी नमूने गहाळ करणाऱ्यावर कारवाई करू असे सामंत यांनी स्पष्ट केले. 

...म्हणूनच रिपोर्ट लवकर 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या वाढलेल्या रुग्णांना सामावून घेण्याची तयारी प्रशासनाची आहे. कोल्हापूर येथून तपासणी रिपोर्ट येण्यास उशीर लागत होते हे उशीर होऊ नयेत आणि आपल्याला रिपोर्ट लवकरात लवकर मिळावेत यासाठी कोल्हापूरच्या त्या लॅबमधे खास माणूस बसवला आहे. त्यामुळेच आता रिपोर्ट फास्ट येऊ लागले आहेत, असेही श्री. सामंत यांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uday Samant Comment On Fake E Pass