esakal | नाणारबाबत आमचा निर्णय 'तोच' ; उदय सामंत
sakal

बोलून बातमी शोधा

subject of nanar project finished for shivsena

मी माझ्या मतदारसंघात पर्यटनावर आधारित पाच प्रकल्प आणले आहेत.

नाणारबाबत आमचा निर्णय 'तोच' ; उदय सामंत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ओरोस : नाणार हा विषय शिवसेनेसाठी संपलेला आहे. काही जण हा विषय पुन्हा काढून अस्तित्वासाठी प्रयत्न करीत आहेत. मालवण वायंगणी-तोंडवळी येथील नियोजित सी-वर्ल्ड प्रकल्प कमीतकमी जागेत उभारण्यास शिवसेना तयार आहे; पण त्यासाठी स्थानिकांनी सहमती दिली पाहिजे. ही सहमती मिळाली तर आम्ही शासकीय अथवा खासगी संस्थेमार्फत हा प्रकल्प उभारू, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा - किल्ले संवर्धनाबाबत संभाजी राजेंची तळमळ, कोकणाबाबत म्हणाले...

पालकमंत्री सामंत आज एक दिवसाच्या दौऱ्यावर जिल्ह्यात आले होते. त्यांनी जिल्ह्याचे प्रशासन व सरपंच यांच्यासमवेत गणेशोत्सव नियोजन व कोरोना आढावा बैठक घेतली. यानंतर दुपारी त्यांनी ऑनलाईन पद्धतीने जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी पक्षप्रमुख म्हणून यापूर्वीच नाणारविरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदार भास्कर जाधव यांनी या प्रकल्पाचे समर्थन केले तरी हा प्रकल्प होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे; मात्र सी-वर्ल्ड प्रकल्पाला आमचा विरोध नाही. तेथील स्थानिकांचा विरोध आहे. त्यांनी सहमती दिली तरच हा प्रकल्प होईल."

कोकणातील प्रकल्पांना शिवसेना नेहमीच विरोध करीत आली आहे. त्यांचा हा विरोध राजकीय फायद्यासाठी असल्याचा आरोप होत असल्याकडे लक्ष वेधले असता, पालकमंत्री सामंत म्हणाले, मी माझ्या मतदारसंघात पर्यटनावर आधारित पाच प्रकल्प आणले आहेत. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी कोकणात पर्यटन प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे." यावर सिंधुदुर्गातही असे प्रकल्प आणा, असे सांगितले असता ते म्हणाले, या जिल्ह्यात प्रकल्प आणणारे थकले आहेत. त्यामुळे मलाच आता येथे प्रकल्प आणावे लागतील.

हेही वाचा - वीज बिलांबाबत तेलींचा संताप, आरोग्य यंत्रणेच्याही मुद्द्यावर बोट

खासदार नारायण राणे यांच्या पडवे येथील मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना तपासणी केंद्र सुरू होत असल्याकडे लक्ष वेधले असता पालकमंत्री सामंत यांनी, जिल्ह्यात जनतेच्या फायद्यासाठी एखादी सुविधा कोणीही उभी केल्यास त्याचे कौतुकच केले पाहिजे; मात्र त्यांनीही अशा सुविधा दुसऱ्यांनी सुरू केल्यास त्यांचे कौतुक करण्यास शिकावे, असा सल्ला दिला.

रवींद्र चव्हाणच शिवसेनेत येतील
यावेळी भाजपच्या रवींद्र चव्हाण यांनी उदय सामंत भाजपमध्ये येतील, अशा केलेल्या वक्तव्याकडे लक्ष वेधले असता मंत्री सामंत यांनी चव्हाण हेच शिवसेनेत येतील, असा दावा केला.

loading image
go to top