जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा मुद्दा सोडलेला नाहीः उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी मुद्दा अद्यापही सोडला नाही. सरकारला काय हवे आहे याच्यापेक्षा लोकांना काय हवे आहे, याला आपले प्राधान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

राजापूर : सत्तेत असलो आणि नसलो तरी शिवसेनेने नेहमीच लोकहित जोपासले असून भविष्यामध्येही कायम ठेवणार असल्याची रोखठोक आणि आक्रमक भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली. तसेच तालुक्‍यातील नाणार येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीला विरोध करणाऱ्या ग्रामस्थ, प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी शिवसेना कायम राहील, असेही त्यांनी सांगितले.

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी मुद्दा अद्यापही सोडला नाही. सरकारला काय हवे आहे याच्यापेक्षा लोकांना काय हवे आहे, याला आपले प्राधान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळ्यासाठी ठाकरे आज राजापुरात आले होते. त्यावेळी रिफायनरी विरोधी शेतकरी, मच्छीमार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. प्रकल्पाच्याबाबतीत सरकारला काय हवे आहे, यापेक्षा लोकांना काय हवे आहे हे महत्वाचे असल्याचे सांगताना लोकांच्या मताला शिवसेना महत्व देत असल्याचे स्पष्ट केले. रिफायनरी प्रकल्पाच्या बाजूला माडबन येथे केंद्र शासनातर्फे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. या प्रकल्पाच्या विरोधात सुरवातीला आक्रमक असलेल्या शिवसेनेतर्फे गेल्या काही महिन्यांमध्ये कोणतेही आंदोलन छेडलेले नाही. असे असताना ठाकरे यांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला असलेला विरोध अद्यापही मावळला नसल्याचे त्यांनी सांगितले. 
 

Web Title: Uddhav Thackeray talked about Jaitapur nuclear project