परवानगी तीन बोटींना, परंतु उपसा शंभर बोटींकडून ; वाशिष्ठी खाडीत अनधिकृत वाळू उपसा

मुझफ्फर खान
Saturday, 23 January 2021

वाशिष्ठी खाडीतील एका गटात वाळू उपसा करण्यासाठी खनिकर्म विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे.

चिपळूण - वाशिष्ठी खाडीत कालुस्ते परिसरातील एका गटात वाळू उत्खन्न करण्याची परवानगी शासनाकडून देण्यात आली आहे. मात्र वाशिष्ठी खाडीतील अन्य गटातही अवैध वाळू उपसा सुरू आहे. 3 बोटीने केवळ 12 ब्रास वाळू उपसा करण्याची परवानगी असताना 100 हून अधिक बोटींनी वाळू उपसा सुरू आहे. दिवसाला चारशेहून अधिक ब्रास वाळू उपसली जात आहे. परवानगी असलेल्या बोटी सोडून इतर बोटी कोणाच्या आहेत त्यांचा शोध घेवून कारवाई व्हावी अशी मागणी खाडीपट्यासह खेडमधील वाळू व्यवसायिकांकडून केली जात आहे. 

वाशिष्ठी खाडीतील एका गटात वाळू उपसा करण्यासाठी खनिकर्म विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे. सुमारे 45 लाखाची रक्कम एका वाळू व्यवसायिकाला भरणे शक्य नसल्यामुळे अनेक गरजू वाळू व्यवसायिक एकत्र आले आहेत. त्यांनी शासनाची रॉयल्टीसह इतर कराची रक्कम भरून कालुस्ते परिसरातील एका गटात वाळू उपसा करण्याची परवानी मिळवली. या गटाला तीन महिन्यात केवळ हजार ब्रास वाळू उपसा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तीन महिन्यातील प्रत्येक दिवशी 3 बोटीने केवळ 12 ब्रास वाळूचा त्यांना उपसा करता येणार आहे. मात्र सद्यस्थितीत गोवळकोट खाडीत शंभरहून अधिक बोटींनी धुमाकूळ घातला आहे. 

3 बोटी सोडून उर्वरित बोटींनी अनधिकृतपणे उत्खन्न सुरू आहे. परवानगी नसलेल्या गटातही वाळू उपसा केला जात आहे. त्यामुळे शासनाची रॉयल्टी भरून व्यवसाय करणार्‍या व्यवसायिकांवर अन्याय होत आहे.

परवानाधारक वाळू व्यवसायिकांना त्यांच्या बोटीतील वाळू रिकामी करण्यासाठी कालुस्ते येथील एका प्लॉटला परवानगी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत कालुस्ते खाडी किनारच्या संपूर्ण भागात अनधिकृतपणे वाळू रिकामी केली जात आहे. त्यामुळे खाडी किनारच्या संपूर्ण भागाला प्लॅटचे स्वरूप आले आहे. वाशिष्ठी खाडीतील वाळू चिपळूणसह गुहागर व खेड तालुक्यातील पंधरा गाव परिसरात विकली जात आहे. वाळूची अनधिकृत वाहतूक रोखण्यासाठी गोवळकोट येथे महसूल विभागाकडून चेकपोस्ट नाका बसविण्यात आला होता. महसूलकडून तो हटविण्यात आल्यामुळे अनधिकृत वाळू व्यवसाय करणार्‍यांचे फावले आहे. महसूल विभागाने गोवळकोटसह चिपळूणच्या सर्वच सीमांवर चेकपोस्ट बसवावेत अशी मागणी केली जात आहे. 

ग्राहकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधींचे प्रयत्न सुरू असले तरी रॉयल्टी भरलेली वाळू प्रतिब्रास 7 ते 8 हजार रुपये दराने विकली जात आहे. रिपीटच्या वाळूला जाग्यावर चार हजार रुपये ब्रास असा दर आहे.

हे पण वाचा - भाजपशी युती तुटल्याने शिवसेना दमदार

 

कालुस्ते परिसरात होणार्‍या वाळू उपशाबाबत मला काहीच माहिती नाही. वरिष्ठ अधिकार्‍यांकडून जी सूचना येते त्या सूचनांचे आम्ही पालन करतो. त्यामुळे तुम्हाला जी माहिती हवी असेल ती आमच्या वरिष्ठांकडून घ्या अशी असे कालुस्ते गावच्या तलाठी दमयंती माने यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unauthorized sand extraction in chiplun