शिक्षक घडविणाऱ्या ‘डीएलएड’ कडे का फिरवताहेत विद्यार्थी पाठ ?

under the DLA organisation the education field interested candidates ignored in sindhudurg
under the DLA organisation the education field interested candidates ignored in sindhudurg

सावंतवाडी : रखडलेली शिक्षक भरती, त्यातून डीएलएडचे कमी झालेले महत्त्व, नव्या शैक्षणिक धोरणात अध्यापक पदवीधारकाला कमी आलेले महत्त्व, आदी कारणांमुळे शिक्षकीपेशा घडविणाऱ्या ‘डीएलएड’कडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. अनेकांनी स्पर्धा परीक्षांवर भर दिला आहे. चार वर्षे डीएलएडची प्रवेश प्रक्रिया रखडत असून अनुदानित आणि विनाअनुदानित अशा दोन्ही प्रकारच्या महाविद्यालयांत ४२४ जागा उपलब्ध असताना अवघ्या ३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

काही वर्षापूर्वी ‘मेरिट लिस्ट’वर प्रवेश मिळणाऱ्या अध्यापक विद्यालयांमध्ये आता इच्छुकाला सहज प्रवेश मिळत आहे. जिल्ह्यातील मुलांना प्रवेश प्रक्रियेसाठी पूर्वी कोल्हापूर आणि कोकण बोर्ड झाल्यानंतर रत्नागिरी येथे जावे लागायचे. या ठिकाणी कागदपत्रे तपासणी, तसेच इच्छुक डीएलएड महाविद्यालयाची निवड आदी प्रक्रिया होत असायची. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून राज्यभर शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रम चालवला जातो. या अभ्यासक्रमाला आधी डीएड (डिप्लोमा इन एज्युकेशन), नंतर डीटीएड (डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन) आणि आता डीएलएड (डिप्लोमा इन इलिमेंटरी एज्युकेशन) या नावाने ओळखले जाते.

अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर काही वर्षांपूर्वी शिक्षक नोकरीची हमखास संधी होती. त्यामुळे अनेकांची पावले आपसूकच याकडे वळत होती. त्यातून शासनमान्य विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मोठी स्पर्धा असायची. काही वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरावे लागत होते. त्यातून गुणवत्ता यादी निश्‍चित होऊन पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली जात होती. त्यानंतर गुणवत्ता यादीप्रमाणे पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत होता.

पूर्वी विद्यार्थ्यांमध्ये संस्कार व नीतिमूल्य वाढवण्यासाठी सेवाभाव व भविष्यातील भावी पिढी घडवण्याच्या उद्देशाने अनेक प्रामाणिकपणाचा असणाऱ्या व्यक्ती शिक्षकी पेशामध्ये येत असत; मात्र गेल्या काही वर्षांत शिक्षकी पेशाकडे फक्त नोकरीच्या उद्देशाने बघितले जात आहे. आठ ते नऊ वर्षांपूर्वी डीएलएडकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णतः बदलला आहे. त्यामुळे इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील डीएलएड अभ्यासक्रमाच्या पदविकेमध्ये मोठा फरक जाणवत आहे. सद्यस्थिती पाहता दहा वर्षांपासून शिक्षक भरतीचे घोंगडे भिजत राहिले आहे.

गतवर्षी राज्यामध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पाच हजार ८०० शिक्षकांची भरती झाली; मात्र त्यांनाही तुटपुंजा म्हणजे सहा हजार रुपये एवढ्या मानधनावर नियुक्ती देण्यात आली. टीईटी आणि सीटीईटी या परीक्षा पात्र झाल्यानंतर अभियोग्यता चाचणी देऊनही भरतीमध्ये पात्र केलेल्या अनेक नव्या पिढीतील शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. राज्यात असे लाखो विद्यार्थी अद्यापही भरती होणार या प्रतीक्षेतच बसून आहेत. सीईटी, टीईटीसारख्या परीक्षांचे अडथळे पार करूनही राज्यात शिक्षक भरती कधी होईल, हे मात्र अद्याप अनिश्‍चित आहे.

टीईटी, सीटीईटी परीक्षा पात्र होण्यासाठी भरपूर अभ्यास व पहिली ते आठवी आणि डीएलएड पाठ्यक्रमातील सर्व घटक व अभ्यासक्रमाशी जोड ठेवावी लागते. यासाठी अनेक विद्यार्थी शिक्षक भरतीच्या अपेक्षा या परीक्षेची तयारी करत असायचे.
गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीमुळे हजारो विद्यार्थी नोकरीचे अन्य मार्ग आता निवडू लागले आहेत. गेल्या काही वर्षांतील चित्र पाहता आता शिक्षक भरती क्रमाचा अभ्यास सोडून अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांतील पदवीनंतर स्पर्धा परीक्षांकडे वळू लागले आहेत. त्यादृष्टीने त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला आहे. शिक्षक होण्याचे कारण म्हणजे सुजाण भावी पिढी घडविण्याचे भाग्य मिळते. मात्र, वर्षानुवर्षे शिक्षक भरतीच झाली नाही. त्यामुळे या शिक्षणाचा वा पदवीचा उपयोग तरी काय? असे पदवीधारक माधव शिंदे यांनी सांगितले.


भरती रखडल्याचा परिणाम

जिल्ह्यातील अनुदानित आणि विनाअनुदानित अशा दोन्ही प्रकारच्या दहा कॉलेजमध्ये तब्बल ४२४ जागा आहेत; मात्र गेल्या तीन ते चार वर्षांत भरतीप्रक्रिया रखडल्यामुळे प्रवेश प्रक्रियाही रखडत गेली. यंदा फक्त ३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. काही ठिकाणच्या महाविद्यालयांमध्ये १ ते ५ अशी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच संख्या आहे.

शासन कोणतेही असो, वेळोवेळी मागासवर्गीय उमेदवारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. महाविकास आघाडीचे सरकार याबाबत तत्काळ निर्णयाची अंमलबजावणी करेल काय, यावर सर्वांचे भवितव्य अवलंबून आहे. संस्थेच्या जागा भरण्यापूर्वी ५० टक्के कपाती जागांसह, माजी सैनिक, रिक्त जागा भराव्यात, तरच सर्वांना योग्य न्याय मिळेल.

- भाग्यश्री रेवडेकर, उमेदवार

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com