esakal | रत्नागिरीत मिळणार पर्यावरणपूरक उद्योगांना संधी
sakal

बोलून बातमी शोधा

under the innovation district ratnagiri start a new industrial project for newcomers

कारखानदारीचा विस्तार झाल्यास, येथे एकूणच व स्थानिकांना रोजगाराच्या संधी वाढणार आहेत.

रत्नागिरीत मिळणार पर्यावरणपूरक उद्योगांना संधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा हा राज्यासाठी इनोव्हेशन अर्थात नवप्रवर्तन जिल्हा म्हणून निवडण्यात आला आहे. त्या अनुषंगाने नवीन उद्योग यावेत, म्हणून जिल्ह्यातील एमआयडीसीच्या रिकाम्या तसेच वापरात नसलेल्या जागांचा शोध सुरू झाला आहे. कारखानदारीचा विस्तार झाल्यास, येथे एकूणच व स्थानिकांना रोजगाराच्या संधी वाढणार आहेत.

जिल्ह्यात सात औद्योगिक वसाहती आहेत. त्या औद्योगिक वसाहतींमध्ये अद्यापही उद्योगवाढीची संधी आहे. यासाठीच उपलब्ध जागांचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यासोबत इतरत्र उपलब्ध जागांचा शोध घेणे व त्या जागांचे अधिग्रहण करून त्या सर्व जागा उद्योग विस्तारासाठी आणि नव्या उद्योगांसाठी दिल्यास ऊद्योग सुरू होतील आणि नव्या रोजगार संधी निर्माण होणार आहेत. 

हेही वाचा - चार हातांनी दिली दोन पायांना उभारी..! कुठे घडली घटना ? वाचा सविस्तर...

जिल्ह्यात शेती आधारित प्रक्रिया उद्योग आहेत. यात स्थानिक स्तरावर होणारे हापूस आंब्याचे आणि काजूचे उत्पादन यावर आधारित कृषी प्रक्रिया उद्योग आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न भातशेतीतून येते. सोबतच नारळ आणि मसाले यांचेही उत्पादन येथे होत असल्याने कृषी प्रक्रिया आणि संलग्न उद्योगांना कच्चा माल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. या सर्वांचे स्थानिक स्तरावर उद्योगात रूपांतर केल्यास, असे उद्योग निश्‍चितपणे पर्यावरणपूरक कारखानदारी जिल्ह्यात वाढणारे आहेत.

चिपळूण तालुक्‍यात असणाऱ्या औद्योगिक वसाहतींमध्ये मुख्यत्वेकरून केमिकल्स झोन आहे. याच्या जोडीला येथे औषध उत्पादक कारखानदारीला देखील संधी आहेत. एका बाजूला पर्यटन क्षेत्रात असणाऱ्या व्यवसाय आणि रोजगाराच्या संधीला औद्योगिक इनोव्हेशनची जोड प्राप्त झाली तर रत्नागिरी जिल्हा येणाऱ्या काळात मोठे औद्योगिक केंद्र बनेल, हे नक्की; त्याला गती देण्याचे काम या नवप्रवर्तनाद्वारे होणार आहे.

हेही वाचा - आप्तेष्टांना बाप्पाचे दर्शन होण्यासाठी असाही फंडा... 

प्राधान्य पर्यावरणपूरक उद्योगांना

इनोव्हेशन केंद्र उभारल्यानंतर प्रथम प्राधान्य पर्यावरणपूरक उद्योगांना असेल. राज्यात असणारी संधी आणि त्यासाठी लागणाऱ्या मूलभूत साधनसुविधा यांचाही अभ्यास यानिमित्ताने केला जाईल. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व्यवसायाला बळकटी देणारे प्रकल्प वाढविणे शक्‍य आहे. इतर उद्योगांच्या वाढीवर मर्यादा आहेत आणि यामुळेच रत्नागिरीत अधिक प्रमाणात उद्योगाच्या संधी आहेत.

"इनोव्हेशन केंद्र उभारल्यानंतर अडचणीत असलेल्या जिल्ह्याच्या उद्योग व्यवसायाला चालना मिळेल. नवे उद्योग येऊन जिल्ह्याचे अर्थकारण बदलेल, रोजगारांची मोठी संधी निर्माण होईल." 

- समीर झारी, लघु उद्योजक, रत्नागिरी

संपादन - स्नेहल कदम 

loading image