गुड न्यूज ! रत्नागिरीत सोमवारपासून सुरू होणार एसटीची शहरी वाहतूक

मकरंद पटवर्धन
Friday, 18 September 2020

नोकरदार, शहरवासियांना होणार फायदा

रत्नागिरी : रत्नागिरी एसटी आगाराची शहरी वाहतूक येत्या सोमवारपासून ( 21) सुरू होणार आहे. शहरात येणार्‍या नोकरदार वर्गासाठी ही खूषखबर आहे. यासंदर्भात एसटी विभागाने प्रसिद्धीपत्रक दिले आहे. पुरेशी काळजी घेऊन टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरळित करण्यात येणार आहे. प्रवाशांनी मास्क वापरणे अत्यावश्यक आहे. गाड्या निर्जंतुकीकरण करून वापरण्यात येणार आहेत. यासाठी गाड्यांचे नियोजन करण्यात येत आहे.

कोरोना लॉकडाऊनमुळे 23 मार्चपासून शहरी एसटी वाहतूक ठप्प करण्यात आली. त्यानंतर प्रथमच ती पुन्हा सोमवारी सुरू करण्यात येत आहे. लॉकडाऊन कालावधीत चालक, वाहक आगारामध्ये हजेरीसाठी येत होते. तसेच अनेक कर्मचार्‍यांची कोरोना अँटीजेन टेस्टही करण्यात आली आहे. रिक्षा व खासगी वाहतुकीद्वारे नोकरीसाठी येणे शहराजवळील तरुणांना कठीण होत होते. आता शहरी वाहतूक सुरू होणार असल्याने हे सर्व तरुण आनंदित झाले आहेत.

रत्नागिरी शहरी आगारातून सडामिर्‍या, पिरंदवणे, हातीस, काळबादेवी, डफळवाडी, म्हामूरवाडी, रेल्वेस्टेशन, बसणी, पाडावेवाडी, कसोप, वायंगणी, खेडशीनाका, खेडशी फणसवळे, चिंचखरी वेसुर्ले, मजगाव, मिरजोळे, सतीवाडी, फणसोप, आडी, करंदीकरवाडी, कारवांचीवाडी, आंबेकोंड, तोणदे, दांडेआडम, आनंदनगर, शिवरेवाडी, भगवती, गयाळवाडी, गुरुमळी, भावेआडम, आडी, जुवे आदी गावांत फेर्‍या सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी चालक, वाहक, कर्मचार्‍यांचे नियोजन केले जात आहे. नोकरदार, शहरवासियांना फायदा होणार आहे.

हेही वाचा- कोरोनानंतर आता या आजाराने कोकणात घातलाय धुमाकुळ ; १८ जणांचा बळी -

रत्नागिरीत साधारणपणे 1965 च्या दरम्यान शहरी बसवाहतूक सुरू झाली. महाराष्ट्रात केवळ 13 शहरांमध्ये एसटी महामंडळातर्फे शहरी बसवाहतूक सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, नोकरदार प्रवासी शहरी वाहतुकीमुळे शहरात येऊ शकतात. शहराजवळील पंधरा किलोमीटरच्या टप्प्यातील सुमारे 30 गावांमध्ये शहरी बससेवा सुरू आहे. कोरोनानंतर आता या गावांमध्ये पुन्हा एसटी सुरू होणार असल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Urban transport of ST will start from Monday in Ratnagiri