"युटोपिया'चा सर्वेसर्वा महेश नवाथेला अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

आर्थिक गुन्हे शाखेने महेश नवाथे या मुख्य सूत्रधाराला पकडून मोठी कामगिरी केली. यामध्ये आणखी काही संशयित आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. तसेच त्यांनी ही गुंतवणूक कशामध्ये केली, याचा तपासही केला जाईल. जास्तीत जास्त गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
- प्रणय अशोक, रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक

रत्नागिरी : नवाथे कन्स्ट्रक्‍शनचा "युटोपिया' (मिनी लवासा) हा मोठा गृहप्रकल्प राबविण्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले मुख्य संशयित सूत्रधार महेश गोविंद नवाथे (वय 45, रा. मारुती मंदिर) यांना आज आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईत अटक केली. त्याच्याविरुद्ध 340 तक्रारी असून त्यांनी 14 कोटी 28 लाख 38 हजारांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. तक्रारदारांचा आकडा वाढेल तशी फसवणुकीची रक्कमही वाढणार आहे. यामध्ये चौदा संचालक असून त्यापैकी चौघा संशयितांना अटक केली आहे.

महेश नवाथे याने रत्नागिरीमध्ये धामणसे आणि निवंडी येथे युटोपिया म्हणजे मिनी लवासाचा प्रकल्प राबविण्याची घोषणा केली. विविध प्रसारमाध्यमांद्वारे त्याची जाहिरात केली. कोकणात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प साकारला जाणार होता. त्यामुळे रत्नागिरीबरोबर देश आणि परदेशातूनही यामध्ये गुंतवणूक झाली. विविध सुविधा आणि परतफेडीचे आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवल्याने अनेकांनी प्रकल्पामध्ये मोठी गुंतवणूक केली. साधारण पाच वर्षांपूर्वी लोकांनी ही गुंतवणूक केली होती; परंतु गुंतवणूक करणाऱ्या लोकांना चार वर्षे झाली तरी गुंतवलेली रक्कम परत मिळाली नाही किंवा प्रकल्प ठिकाणी कोणतेच काम सुरू झालेले आढळले नाही. गुंतवणूकदारांनी वारंवार त्याच्या कार्यालयाशी संपर्क साधला; मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. कंपनीचे मुख्य प्रवर्तक किंवा कर्मचारी हजर राहत नसल्याचे निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे याची तक्रार दाखल केली.
नवाथे कन्स्ट्रक्‍शन कंपनीचे रत्नागिरीत अन्य प्रकल्प सुरू आहेत. त्यांचेही काम थांबले आहे. त्यामुळे या तक्रारीदेखील दाखल होण्याची शक्‍यता आहे. आर्थिक गुुन्हे शाखेकडे 340 तक्रारी दाखल झाल्या. यातून गुंतवणूकदारांची 14 कोटी 28 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. 57 तक्रारदारांची गुंतवणूक 2 कोटी 70 लाख 38 हजार 560 एवढी आहे. आर्थिक शाखेने या फसवणूक प्रकरणी यापूर्वी संचालकांपैकी अनिल गांधी, किरण रहाटे, शांताराम ठाकूरदेसाई, सौ. निवेदिता नवाथे आणि आज मुख्य सूत्रधार महेश नवाथे यांना अटक केली. मुंबई-डोंबिवली येथे ही कारवाई केली. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गंभीर, श्री. कोळी, श्री. घाग, श्री. बने, चंदन जाधव, श्री. कदम आदींनी ही कारवाई केली.

आर्थिक गुन्हे शाखेने महेश नवाथे या मुख्य सूत्रधाराला पकडून मोठी कामगिरी केली. यामध्ये आणखी काही संशयित आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. तसेच त्यांनी ही गुंतवणूक कशामध्ये केली, याचा तपासही केला जाईल. जास्तीत जास्त गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
- प्रणय अशोक, रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक

Web Title: utopia's navathe arrested