esakal | लसीच्या तुटवड्यामुळे नागरिक केंद्रावरून माघारी; दापोलीतील स्थिती
sakal

बोलून बातमी शोधा

लसीच्या तुटवड्यामुळे नागरिक केंद्रावरून माघारी; दापोलीतील स्थिती

लसीच्या तुटवड्यामुळे नागरिक केंद्रावरून माघारी; दापोलीतील स्थिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दाभोळ : राज्यभरात कोविडचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र दापोली तालुक्‍यात पाहिजे त्या प्रमाणात लस येत नसल्याने अनेकांना दररोज लसीकरण केंद्रावरून परत जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्‍त केली जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी सध्या लसीकरण हाच उपाय असला तरी या लसीचे पाहिजे त्या प्रमाणात जिल्हास्तरावरून लस तालुक्‍यातील लसीकरण केंद्रावर येत नसल्याने लसीकरण मोहीम थंडावली आहे. यापूर्वी जेव्हा पुरेशी लस होती तेव्हा नागरिक लसीकरणापासून लांब राहात होते. आता कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लसीकरण करून घेण्यासाठी तालुक्‍यातील 8 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी तसेच दापोली उपजिल्हा रुग्णालयात नागरिक गर्दी करत आहेत.

दररोज सकाळी 6 वाजल्यापासून या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नागरिक रांगा लावत आहेत. दररोज केवळ 50 ते 100 लसी पुरविल्या जात असल्याने अनेकांना लस न घेताच घरी परतावे लागत आहे. लस केव्हा येणार याची शाश्‍वतीही आरोग्य केंद्रातून दिली जात नसल्याने नागरिक संध्याकाळपर्यंत लस येण्याची वाट पाहात आरोग्य केंद्रातच ठिय्या मारून बसलेले दिसून येत आहे.

हेही वाचा: शेतकऱ्याला वळीवचा तडाखा; डोळ्यादेखत दीड एकराची बाग जमीनदोस्त

उपजिल्हा रुग्णालयालाही दररोज केवळ 50 लसींचा पुरवठा केला जात असला तरी रांगेत 150 नागरिक उभे असतात. 10 लसी या ऑनलाइन नोंदणी केलेल्या नागरिकांना दिल्या जात असून रांगेतील केवळ 40 नागरिकांना संध्याकाळपर्यंत लस दिली जाते. त्यामुळे आता अनेकजण दररोज सकाळी 6 वाजता उपजिल्हा रुग्णालयात येऊन रांग लावत आहेत. अनेकांनी पहिला डोस घेतलेला असून त्यांना आता दुसरा डोस कसा मिळणार? याचीच चिंता या वाढत्या गर्दीमुळे लागली आहे.

उपजिल्हा रुग्णालयातील केंद्र सोहनी विद्यामंदिरात

उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्र आता दापोली शिक्षण संस्थेच्या आदरणीय गोपाळकृष्ण सोहनी विद्यामंदिराच्या वर्गखोल्यांमध्ये हलविण्यात आले आहे. या शिक्षणसंस्थेचे आवार मोठे असल्याने आता नागरिकांना दाटीवाटीने रांग लावण्याची गरज भासणार नाही. या केंद्रावर लसच आलेली नसल्याने लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना परत जावे लागले.

loading image