
शेतकऱ्याला वळीवचा तडाखा; डोळ्यादेखत दीड एकराची बाग जमीनदोस्त
नवेखेड (सांगली) : वर्षभर जीवापाड जपलेली पपईची बाग काल रात्री जमीनदोस्त होत असताना अश्रू अनावर झाले. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास निसर्गाने काढून घेतला अशी भावना बोरगाव येथील प्रगतशील शेतकरी शिवाजी वाटेगावकर यांनी व्यक्त केली. काल रात्री झालेल्या पावसाने आणि प्रचंड वाऱ्याने वाळवा तालुक्यातील १०० एकराहून अधिक क्षेत्रातील पपई व केळीच्या बागा जमीन दोस्त झाल्या. या पावसामुळ शेतकऱ्यांनी पाहिलेल्या हिरव्या स्वप्नाचा चक्काचूर झाला आहे.
नगदी फळ पिकांना कालच्या वळीव पावसाचा तडाखा बसला. गेले वर्षभर कोरोना प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या मालाला हवा तसा भाव मिळलेला नाही. सध्या रमजान महिन्यामुळे फळांना काही प्रमाणात दर वाढवून मिळत होता, मात्र असे असतानाच अस्मानी संकटांनी शेतकरी हादरला आहे. वाळवा तालुक्यात बोरगाव, रेठरेहरणाक्ष, आष्टा, बावची, मर्दवाडी, तांदुळवाडी, ऐतवडे खुर्द परिसरात या बागांचे प्रमाण अधिक आहे. आज कृषीविभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देऊन नुकसानीचे पंचनामे केले आहेच. शेतकऱ्यांनी तात्काळ नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
हेही वाचा: 'गोकुळ'चे कोरोना बाधित ठरावदार पीपीई किट घालून करणार मतदान
"रात्री सोसाट्याच्या वाऱ्यात व पावसात मी स्वतः पपईच्या बागेत हजर होतो. डोळ्यादेखत दीड एकर बाग जमीनदोस्त झाली."
- शिवाजी वाटेगावकर, शेतकरी (बोरगाव)
Web Title: Rain In Sangli Area Effect On Fruit Farming Of Farmers Yesterday
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..