esakal | वैभववाडीत वातावरण तंग: अधिकाऱ्यांशी हुज्जत; नागरिक संतप्त

बोलून बातमी शोधा

वैभववाडीत वातावरण तंग: अधिकाऱ्यांशी हुज्जत; नागरिक संतप्त
वैभववाडीत वातावरण तंग: अधिकाऱ्यांशी हुज्जत; नागरिक संतप्त
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : रांगेत असलेल्या नागरिकांना वगळून काही शासकीय कर्मचाऱ्यांना लसीकरण केल्यामुळे सकाळपासून लसीकरणासाठी ताटकळत बसलेल्या संतप्त नागरिकांनी रूग्णालय प्रशासनाशी हुज्जत घातली. त्यामुळे अर्धातास लसीकरण थांबविण्यात आले. दरम्यान, तहसीलदार आणि पोलिस निरीक्षकांनी मध्यस्थी केल्यानंतर टोकन पद्धतीने लसीकरणाला सुरूवात झाली.

आज ग्रामीण रूग्णालयाला लशीचे 200 डोस प्राप्त झाले होते. आज सकाळी सात वाजल्यापासून नागरिकांनी रूग्णालयाबाहेर रांग लावली. 10 वाजता प्रत्यक्षात लसीकरण सुरू झाले. तासभर लसीकरण झाल्यानंतर काही शासकीय कर्मचारी लसीकरणासाठी आले. रांगेतील नागरिकांना वगळून शासकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण होत असल्याने सकाळपासून रांगेत थाबलेल्यांमध्ये कुजबुज सुरू झाली. यासंदर्भात काहींनी थेट रूग्णालय प्रशासनाकडे आक्षेप नोंदवित अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला.

"आम्ही सकाळपासून रांगेत असताना तुम्ही अशा प्रकारे लसीकरण कसे करता?' असा प्रश्‍न नागरिकांनी प्रशासनाला केला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना लसीकरण करणे बंधनकारक असल्याचे सांगितले; परंतु लोक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे लसीकरण थांबविले. तहसीलदार रामदास झळके आणि पोलिस निरीक्षक अतुल जाधव रूग्णालयात आले. लसीकरणावरून वाद होऊ नये म्हणून टोकन पद्धत अवलंबण्याची सूचना त्यांनी केली. त्यानंतर सर्वांना उपलब्ध डोसप्रमाणे टोकन देण्यात आले. त्यानंतर पुन्हा लसीकरण सुरू झाले. ज्यांना टोकन मिळाले नाही त्यांना पुढील दिवस देण्यात आला. यापुढे टोकन पद्धतीनेच लसीकरण करण्याचे निश्‍तिच केले.

हेही वाचा- रिझर्व्ह बॅंकेचा मोठा निर्णय: सहकारी बॅंकांना कर्जमर्यादा;उद्योजकांना लाभ

लसीकरण करताना शासकीय कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे, असे आदेश आहेत. ज्या अधिकाऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली; त्यांनाच लस दिली; परंतु काहींचा गैरसमज झाल्यामुळे गोंधळ उडाला. आता गोंधळ उडू नये म्हणून टोकन पद्धत अवलंबली आहे.

- डॉ. एम. बी. सोनवणे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रूग्णालय, वैभववाडी

Edited By- Archana Banage