घोटगे-सोनवडे घाट रस्त्याला राज्य वन्यजीव समितीची मान्यता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 जानेवारी 2019

मालवण - कोल्हापूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जोडणार्‍या घोटगे सोनवडे घाट रस्त्याला राज्य वन्यजीव समितीने मान्यता दिली आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. 

मालवण - कोल्हापूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जोडणार्‍या घोटगे सोनवडे घाट रस्त्याला राज्य वन्यजीव समितीने मान्यता दिली आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. 

खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी सातत्याने यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव समितीच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव ८ जानेवारीला केंद्राच्या समितीकडे पाठविण्यात आला आहे.   

घोटगे सोनवडे घाट रस्ता पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात असल्याने पर्यावरण विभागाच्या विविध परवानग्या आवश्यक होत्या. गेली कित्येक वर्ष सोनवडे घाट रस्त्याचा प्रश्न यामुळे प्रलंबित असल्याने हा प्रश्‍न मार्गी लावण्यास खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक हे सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा करत होते. त्यांच्या या पाठपुराव्यामुळेच वन विभागाच्या २५. ७६ हेक्टर वनक्षेत्रातील ११ हजार १९२ झाडांच्या तोडणीसाठी व वनक्षेत्रातील रस्त्याच्या कामाला मुख्य वनसंरक्षकांनी परवानगी दिली आहे. या रस्त्यासाठी वन्यजीव विभाग नागपूर यांची स्टेज १ ची परवानगी मिळाली आहे.   

परवानगी मिळाल्यावर वन्यजीव राज्य बोर्डच्या परवानगीसाठी वनविभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यावरण आणि वनविभागाचे सचिव सदस्य असलेल्या राज्य वन्यजीव समितीच्या बैठकीत या रस्त्याला  मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्राच्या समितीकडे महसूल व वनविभागाचे संयुक्त सचिव सुजय दोड यांच्या स्वाक्षरीने पाठविण्यात आला आहे.

सोनवडे - घोटगे - शिवडाव हा राज्यमार्ग सिंधुदुर्ग, कोल्हापूर-राधानगरी वन्यजीव अभयारण्याच्या हद्दीतून जातो. राधानगरी अभयारण्याचा या घाटरस्त्याच्या कामात २. ७५ किलोमीटर भाग येत असल्याने या कामासाठी वन्यजीव, पर्यावरण विभागाची परवानगी घेण्याची अट घालण्यात आली होती. त्यानुसार राज्यस्तरीय समितीने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे अशी माहितीही श्री. नाईक यांनी दिली.

Web Title: Vaibhav Naik press conference