पत्नीला जबरदस्तीने पळवणाऱ्यास पकडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

वैभववाडी - स्वतःच्या पत्नीला जबरदस्तीने जंगलात पळवून नेणाऱ्या त्या नेपाळी तरुणाला नऊ तासांनंतर केळवलीत स्थानिकांनी पकडले. त्यामुळे सकाळपासून चिंतेत असणाऱ्या त्या फार्महाऊसवरील नेपाळी दाम्पत्यांचा जीव भांड्यात पडला. हा प्रकार आज सकाळी नऊ वाजता तिथवली फार्महाऊस येथे घडला.

वैभववाडी - स्वतःच्या पत्नीला जबरदस्तीने जंगलात पळवून नेणाऱ्या त्या नेपाळी तरुणाला नऊ तासांनंतर केळवलीत स्थानिकांनी पकडले. त्यामुळे सकाळपासून चिंतेत असणाऱ्या त्या फार्महाऊसवरील नेपाळी दाम्पत्यांचा जीव भांड्यात पडला. हा प्रकार आज सकाळी नऊ वाजता तिथवली फार्महाऊस येथे घडला.

तिथवली येथील एका फार्महाऊसमध्ये नेपाळी दाम्पत्य कामाला आहे. या दाम्पत्यांची मुलगी वर्षभरापूर्वी एका नेपाळी तरुणाबरोबर पळून गेली होती. त्यानंतर तिचा आणि कुटुंबाचा संपर्क झाला नव्हता. काही महिन्यांपूर्वी तिचा आणि आई-वडिलांचा संपर्क झाला. त्यानंतर फोनवरून ते एकमेकांच्या सतत संपर्कात होते. त्या मुलीच्या आई-वडिलांनी मुलगी आणि तिच्या नवऱ्याला येथे बोलविले. त्यानुसार दोन-तीन दिवसांपूर्वी ती दोघे आणि त्या मुलाचा एक नातेवाईक तिथवली येथे आले. आपला नवरा आपल्याला त्रास देत असल्याची माहिती त्या मुलीने आई-वडिलांना दिल्यामुळे ते नेपाळी कुटुंब अस्वस्थ होते. त्यामुळे त्यांनी मुलगी महिनाभर येथेच राहू दे त्यानंतर तुम्ही तिला घेऊन जा, असे तिच्या नवऱ्याला सांगितले. त्यानेही ते मान्य करीत आपण उद्याच जातो, असे सांगितले.
आज सकाळी ते नेपाळी दाम्पत्य नियमित काम करण्यासाठी राहत असलेल्या फार्महाऊसपासून काही अंतरावर गेले होते. 

ते काम करीत असताना त्यांना फार्महाऊसच्या दिशेने आपली मुलगी ओरडताना ऐकू आली. त्यामुळे ते दोघेही फार्महाऊसच्या दिशने धावत सुटले. त्यांच्या पाठोपाठ त्या नेपाळी तरुणाचा नातेवाईकही जात होता. मुलीच्या वडिलांनी धाडस दाखवत त्या नातेवाइकाला पकडले; मात्र तो तरुण मुलीला घेऊन जंगलाच्या दिशेने निघून गेला. ही माहिती गावातील काही लोकांना समजली. स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत त्या नातेवाईकाला चांगलाच प्रसाद दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्या मुलीच्या आई-वडिलांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार अर्ज दिला.

जंगलात पळवून नेणारा तो नेपाळी तरुण  पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आपल्या नातेवाइकाला सोडून द्या, नाहीतर पत्नीला मारेन, अशी फोनवरून धमकी देत होता. त्यामुळे त्या नेपाळी दाम्पत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. काही स्थानिक तरुण आजूबाजूच्या गावांमध्ये त्यांचा शोध घेत होते. केळवली किंवा त्या परिसरात तो जंगलातून जाईल, या शक्‍यतेने स्थानिकांना माहिती देण्यात आली होती. अखेर आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास केळवलीतील काहींना तो नेपाळी तरुण जंगलातून रस्त्यावर आलेला दिसला. त्यांनी तत्काळ त्याला पकडले आणि तिथवलीतील तरुणांना माहिती दिली. त्या मुलीचे पालक आणि काही तरुण त्याला आणण्यासाठी केळवलीला गेले आहेत. रात्री उशिरा त्याला पोलिसांत आणण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Vaibhavwadi crime news