रूग्णालयाला टाळे ठोकायचे का? ः आमदार राणे 

Vaibhavwadi Hospital issue press conference mla nitesh rane
Vaibhavwadi Hospital issue press conference mla nitesh rane

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत; मात्र येथील ग्रामीण रूग्णालयात एकही डॉक्‍टर नाही. रूग्ण तपासणीकरीता प्रतिनियुक्तीवर दिलेला डॉक्‍टरही डोळ्याचा आहे. ते अन्य रूग्णांची तपासणी कशी करणार? असे अनेक प्रश्‍न उपस्थित करीत जर रूग्णालयाची स्थिती सुधारणार नसेल तर रूग्णालयाला टाळे ठोकायचे का? असा संतप्त सवाल रूग्णालय प्रशासनाला विचारीत राज्य सरकारच आरोग्यबाबत गंभीर नसल्याची टीका आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली. 

येथील ग्रामीण रूग्णालयाला आमदार राणे यांनी आज भेट देत आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण सभापती सावी लोके, शारदा कांबळे, नासीर काझी, जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, सुधीर नकाशे, डॉ. सोनवणे आदी उपस्थित होते. आमदार राणे यांनी रूग्णालयात कार्यरत डॉक्‍टर किती आहेत? असा प्रश्‍न केला असता, सध्या कणकवली रूग्णालयातील नेत्रचिकीत्सा तज्ञ डॉ. सोनवणे हे प्रतिनियुक्तीवर काम करीत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आमदार राणे संतप्त झाले. राज्यात पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे.

जिल्ह्यात सुध्दा सतर्कतेच्या सुचना दिलेल्या आहेत; परंतु कोरोनाशी लढताना मुख्य भुमिका असलेला विभागाची स्थितीच भयंकर आहे. डोळ्याचे डॉक्‍टर रूग्णांच्या पायावर कसा उपचार करतील? असा प्रश्‍न देखील त्यांनी उपस्थित केला. राज्य शासनच गंभीर नसल्याची टिका त्यांनी केली. डॉक्‍टर नाही, कर्मचारी नाही, साफसफाई कामगार नसतील तर रूग्णालयाला टाळे ठोकायचे का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर आमदार राणे यांनी प्रभारी जिल्हा शल्यचिकीत्सक श्रीमती गावकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. त्यांना देखील श्री. राणे यांनी वैभववाडी ग्रामीण रूग्णालयाच्या दुरावस्थेवरून जाब विचारला.

रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी औषध कमतरता, कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा, मद्यधुंद अवस्थेत रूग्णालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे होणारा त्रास, नादुरूस्त वीजमीटर, सांडपाणी आदी मुद्दे आमदार श्री. राणे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी सर्व मुद्दे ऐकल्यानंतर रूग्णालयीन कारभार सुधारण्यासाठी मी आपल्याला पाठबळ देईन. राजीनामा देवुन गेलेले डॉ. धर्मे यांच्याशी त्यांनी संपर्क साधुन काम करा, असा आग्रह त्यांनी धरला. याशिवाय विविध मुद्द्यांबाबत आजच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांचे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले. रूग्णालयात पाणी पुरवठा कधी करणार? असा प्रश्‍न त्यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी सुरज कांबळे यांना विचारला. यावर कांबळे यांनी आठ दिवसांत पाणीपुरवठा करणार असल्याचे स्पष्ट केले. 

सरकारची दादागिरी खपवणार नाही 
कोरोनाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता महावितरण कंपनी कोणतेही बील न देता शेतकऱ्यांकडून वसुली करीत आहे. याशिवाय शेतकऱ्यांचा वीजमीटर पुरवठा खंडीत करीत आहे. ही सरकारची अधिकृत दादागिरी सुरू आहे; परंतु आम्ही ती कोणत्याही परिस्थितीत खपवुन घेणार नाही. काय गुन्हे दाखल करायचे ते आमच्यावर करा, असा इशारा आमदार राणे यांनी दिला. 

पालकमंत्री विशेष कारणासाठी येतात 
ग्रामीण रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकडून रिक्त पदाची यादी दिल्यानंतर आमदार राणे यांनी ही यादी माझ्याकडे देण्यापेक्षा पालकमंत्र्याकडे द्या; परंतु ते तुम्हाला भेटणार नाहीत. त्यांना वेळ नाही. ते वैभववाडीला विशेष कारणासाठीच येतात, अशी टिप्पणी आमदार राणे यांनी केली. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com