वैभववाडी : बंडखोरांना शिवसेना जागा दाखवेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Atul Ravrane

वैभववाडी : बंडखोरांना शिवसेना जागा दाखवेल

वैभववाडी : पालकमंत्री उदय सामंत आणि माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केलेले बंड हे स्वतःच्या स्वार्थासाठी असून अशा बंडखोरांना शिवसेना जागा दाखवेल. निष्ठावान शिवसैनिक त्यांना कदापि माफ करणार नाही, असे मत शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी येथे व्यक्त केले.

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात पालकमंत्री सामंत आणि केसरकर हे सामील झाले आहेत. त्या दोघांवर आज श्री. रावराणे यांनी येथील शिवसेना संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन टीका केली. यावेळी त्यांच्यासोबत तालुकाप्रमुख मंगेश लोके, रमेश तावडे, रवींद्र रावराणे, संजय चव्हाण, दीपक पांचाळ, सुनील रावराणे, रणजित तावडे आदी उपस्थित होते.

श्री. रावराणे म्हणाले, ‘‘बंड पुकारलेले सामंत आणि केसरकर यांची भूमिका आता सोयीनुसार बदलली आहे. केसरकर हे आता हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करीत आहेत. परंतु, ते पूर्वी कोणत्या पक्षात होते. मागील आठ वर्षे ते शिवसेनेत आहेत. तत्पूर्वी ते अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. त्यावेळी त्यांनी कधीही हिंदुत्वाचा पुरस्कार केला नाही. परंतु, आता स्वतःच्या स्वार्थासाठी ते हा मुद्दा पुढे करीत आहेत. शिवसेनेत आल्यानंतर त्यांचा पक्षाने मानसन्मान केला आहे.

राज्य, अर्थमंत्रिपद त्यांना देण्यात आले. या जिल्हयाचे पालकमंत्रिपद त्यांच्याकडे पाच वर्षे होते. तरीदेखील त्यांनी शिवसेनेची साथ सोडली आहे. साथ सोडल्यानंतर ते आपण शिवसेनेत असल्याचे भासवून शिवसैनिकांमध्ये संभ्रम आणि संदिग्धतेचे वातावरण तयार करीत आहेत. ही त्यांची दुटप्पी भुमिका असून शिवसैनिक त्यांच्या कपटकारस्थानात अडकणार नाहीत.’’

श्री. रावराणे यांनी पालकमंत्री सामंत यांच्यावरदेखील टीका केली. ते म्हणाले, ‘‘सुरूवातीला म्हाडाचे उपाध्यक्षपद, त्यानंतर आता कॅबिनेटमंत्री पद, सिंधुदुर्गचे पालकमंत्री अशी पदे त्यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली. परंतु, तरीही त्याचे समाधान झालेले नाही. श्री. सामंत हे सिंधुदुर्गचे पालकमंत्री होतेच. तेथील निर्णय घेतच होते. परंतु, रत्नागिरी जिल्ह्यात देखील कोणती कामे करावीत, हे देखील तेच ठरवित होते. दोन जिल्ह्यांचे पूर्ण अधिकार त्यांच्याकडे होते. मात्र, तरीदेखील ते संतुष्ट झालेले नाहीत. भविष्यात हे दोन्ही नेते कोणत्याच सभागृहात जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात येईल.’’

तर ते इतरांचे काय होणार?

पालकमंत्री उदय सामंत आणि माजी पालकमंत्री दीपक केसरकर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते. दोघांनाही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मानाची पदे दिलीत; परंतु तरीही त्यांनी त्यांची साथ सोडली. त्यानंतर शिवसेनेत आले, येथेही त्यांना सन्मानाची पदे मिळालीत. त्यानंतर आता त्यांनी शिवसेनेची गद्दारी केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी इतके प्रेम या दोघांना दिले. तरीदेखील ते त्यांचे होऊ शकले नाहीत, तर इतरांचे काय होणार? असा प्रश्न अतुल रावराणे यांनी उपस्थित केला.

Web Title: Vaibhavwadi Shiv Sena Minister Uday Samant Mla Deepak Kesarkar Seats Rebels

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..