
वैभववाडीत तीन गावांनी शंभरीचा आकडा केला पार : 'ही पाच' गावे बनताहेत हॉटस्पॉट
वैभववाडी (सिंधुदुर्ग) : तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह(covid 19)रूग्णांची संख्या वाढतीच असुन गेल्या तीन दिवसात सत्तरहुन अधिक रूग्ण सापडले आहेत. तालुक्यात सक्रीय रूग्णांची संख्या २१० असुन एकुण रूग्णसंख्या १ हजार ३६४ पोहोचली आहे. तालुक्यातील तीन गावांनी शंभरीचा आकडा पार केला आहे. सध्या चार ते पाच गाव कोरोनाचे हॉटस्पॉट बनत चालले आहेत. (vaibhavwadi-village-covid-19-update-marathi-news)
कमी लोकसंख्या असलेल्या वैभववाडी तालुक्यात जिल्ह्याच्या तुलनेत रूग्णसंख्या वाढताना दिसत आहे. दिवसागणीक रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या तीन दिवसांत ७० हुन अधिक रूग्ण तालुक्यातील विविध गावांमध्ये आढळुन आले आहेत. तिथवली दिगशी, सोनाळी आणि वैभववाडी या तीन गावांनी शंभरीचा आकडा पार केला आहे. सध्या दिगशी आणि सोनाळी गाव पुर्णतः नियत्रंणात आहे; परंतु नाधवडे, कोकिसरे, आर्चिणे, सांगुळवाडी, सडुरे हे गाव कोरोनाचे हॉटस्पॉट बनत चालले आहेत. आर्चिणेतील रूग्णसंख्या ६३ वर पोहोचली आहे. नाधवडेत एकाच दिवशी ११ रूग्ण आढळुन आले आहेत. तालुक्यातील सात ते आठ गावांनी ५० रूग्णांची संख्या पार केली आहे.
तालुक्यात सध्या २०२ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सक्रीय आहेत. तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या १ हजार ३६४ पोहोचली आहे. सतत वाढणाऱ्या रूग्णसंख्येमुळे आरोग्य प्रशासन चिंतेत आहे. ही रूग्णसंख्या वाढतच राहीली तर त्यांचे विलगीकरण कुठे करायचे? असा प्रश्न आहे. गावागावात कोरोना विलगीकरण कक्ष सुरू करण्याच्या सुचना देण्यात आल्या असल्या तरी गावात कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे अनेक गाव विलगीकरण कक्ष सुरू करण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे रूग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण असेच राहीले तर मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील पथकांची गरज
मुंबईत कोरोना आटोक्यात आणण्यात शासनाला यश आले आहे. त्यामुळे तेथील काही पथके सिंधुदुर्ग जिल्हयात आणली तर त्याचा चांगला परिणाम जिल्हयावर होऊ शकेल. त्याकरीता राजकीय इच्छाशक्ती दाखवुन सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
Web Title: Vaibhavwadi Village Covid 19 Update Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..