वरंध केंद्र आठ वर्षांपासून रखडले

सुनील पाटकर : सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

आरोग्य केंद्राची इमारत आठ वर्षांनी अपूर्णच 

आरोग्य केंद्राची इमारत आठ वर्षांनी अपूर्णच 

वरंधमधील रुग्णांसाठी जागा अपुरी 
महाड : तालुक्‍यातील वरंध गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राला लागलेले अनास्थेचे ग्रहण अद्यापही सुटलेले नाही. हे केंद्र सुरू होऊन 18 वर्षे झाली, तरी त्याला हक्काची इमारत नाही. मंजूर झालेल्या नव्या इमारतीचे काम आठ वर्षांपासून रखडले आहे. लहानशा जागेत रुग्णसेवेचे काम आटोपले जात आहे. 
तालुक्‍यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. वरंध वगळता अन्य ठिकाणी आरोग्य केंद्रांना इमारती आहेत. वरंध विभागातील 18 गावे 44 वाड्यांतील 14 हजार लोकांना आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा परिषदेने 1999 मध्ये वरंध येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले. सुरुवातीला इमारत नसल्याने ग्रामसेवक निवासस्थानात व त्यानंतर भाड्याच्या जागेत हे केंद्र चालवले गेले. सध्या वरंध येथील उपकेंद्राच्या अपुऱ्या जागेतूनच या आरोग्य केंद्राचे काम चालवले जात आहे. 26 जानेवारी 2009 ला वरंधमधील कुंभारवाडा येथे तत्कालीन मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते नव्या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन झाले. चार इमारतींचे नियोजन असलेल्या या या केंद्रात वॉर्डरूम, तपासणी कक्ष, शस्त्रक्रिया कक्ष, प्रशासकीय इमारत अशा सुविधा प्रस्तावित आहेत. ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले होते, त्याला अपघात झाल्याने या इमारतीचे काम रखडले. जिल्हा परिषद प्रशासनाने 2012 मध्ये या केंद्राच्या इमारतीचा ठेका रद्द केला. तोपर्यंत या कामावर 38 लाख 68 हजार रुपये खर्च झाले होते. आठ वर्षे हे काम रखडल्याने इमारतीची पडझड सुरू झाली आहे. तेथे गवत व झुडपे पसरली आहेत. 2015 मध्ये या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या कामाला नव्याने वाढीव दराने मंजुरी मिळाली. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून यासाठी एक कोटी 40 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  
 

Web Title: Varandh helth care center 8 years uncomplet