
मान्सूनची वर्दी देणारे पर्जन्यदूत कोकणात दाखल
रत्नागिरी : कोकणात मॉन्सून दाखल झाला. त्या आधी आणि बरोबर मॉन्सूनची वर्दी देणारे तिबोटी खंड्या, नवरंग, चातक यांसह पिसांना पिवळा रंग चढलेले गाय बगळे हे पर्जन्यदूत रत्नागिरीत ठिकठिकाणी दिसू लागले आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून दाखल होतो. त्यापूर्वी मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी रोहिणी नक्षत्रात पडतात. यंदा मेच्या मध्यात तौक्ते चक्रीवादळ आले आणि चार दिवस मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर निसर्गाने हिरवा शालू पांघरण्यास सुरवात केली. पक्षी, प्राणी या हिरव्या शालूच्या दुलईत विहार करताना दिसू लागले. आता मॉन्सून आल्याचे हवामान खात्याने सांगितले.

पावसाचा संदेश देणारा पक्षी चातक रत्नागिरीतील चंपक मैदानाच्या सड्यावर दिसला. याच ठिकाणी त्याचा दरवर्षी आढळ असतो. दक्षिणेकडून उत्तरेकडे येणाऱ्या या मॉन्सूनच्या वाऱ्याबरोबर त्याचा प्रवास कोकणात होतो. पेरते व्हा, पेरते व्हा, असे शेतकऱ्यांना सांगणारा पावशा देवरूख परिसरात आढळून आला. त्या पाठोपाठ नवरंग आणि तिबोटी खंड्या यांनीही ठिकठिकाणी घरटी बांधायला सुरवात केली आहे. खळाळत जाणारे वहाळ, नद्या, नाले यासह पाण्याच्या स्रोतांच्या ठिकाणी ते सापडतात.

हेही वाचा: बालकांत वाढता उच्च रक्तदाब चिंतेचा; 'ही' आहेत कारणे
तिबोटी खंड्या पोमेंडीतील महालक्ष्मी मंदिराच्या जवळील ओढ्याकिनारी दिसला; तर नवरंगचे दर्शन हातखंबा परिसरातील आंबा बागेत झाले. पावसात नदीकिनारी हा तिबोटी खंड्या संचार करतो. सुगरणीची घरटी म्हणजे पावसाळ्याची चिन्हे वर्तवणारं लक्षण. संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथे ही घरटी सध्या पाहायला मिळतात, तसेच पांढऱ्या गाय बगळ्यांच्या पिसांचा रंग भडक पिवळा झाला की पावसाची वर्दी मिळते. परटवणे येथील खाजण भागात ते पाहायला मिळतात, अशी माहिती पक्षीमित्र प्रतीक मोरे यांनी दिली.
कावळ्याची घरटी मध्यावर
अत्याधुनिक यंत्रणा नव्हत्या तेव्हा निसर्गातील काही बदलांवरून पावसाचे अंदाज वर्तविले जात होते. त्यात कावळ्यांच्या घरट्यांची जागा, उंची आणि अंड्यांची संख्या, टिटवी व ओंबील यांच्या अंड्यांची जागा यासह रोहिणी आणि मृगाच्या किड्यांचे आगमन महत्त्वाचे असे. कावळ्याची घरटी झाडावर कोठे बांधली आहे, यावरील अंदाज काही अंशी खरा ठरतो. यंदा हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज बांधला आहे. त्याला दुजोरा देणारी कावळ्याची घरटी रत्नागिरी शहरातील नाचणे रोडजवळ झाडाच्या मध्यावर उभारलेली आढळली.
हेही वाचा: स्मार्ट गुंतवणूक - म्युच्युअल फंडाची कोटीच्या कोटी उड्डाणे

''चिच्चंत कावळा न्होकला''
''चिच्चंत कावळा न्होकला'' की पाऊस आला असे जुन्या जाणत्यांचे बोल ऐकायला मिळत. चिंच मेच्या मध्यास पानगळ होऊन ओकीबोकी दिसते. हळूहळू तिला नवी पालवी फुटते. पुढच्या काळात ती गडद हिरवीगार बनते. पुढे पाऊस यायला लागला, की ती इतकी गडद होते की त्यात बसलेला कावळा दिसत नाही. शनिवारी (५) चिपळूणजवळील मालघर येथे कावळा दिसणेही कठीण झालेले चिंचेचे झाड पाहायला मिळाले, अशी माहिती संध्या साठे-जोशी यांनी दिली.
Web Title: Various Types Of Birds Are Seen Konkan In Monsoon
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..