बालकांत वाढता उच्च रक्तदाब चिंतेचा; 'ही' आहेत कारणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालकांत वाढता उच्च रक्तदाब चिंतेचा; 'ही' आहेत कारणे

बालकांत वाढता उच्च रक्तदाब चिंतेचा; 'ही' आहेत कारणे

कोल्हापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना धोका वाढण्याची शक्यता वैद्यकीय तज्‍ज्ञांकडून व्यक्त आहे. त्यासाठी जिल्ह्यात बालकांच्या आरोग्याचा आढावा घेण्यात येत आहे. यात मुलांचा वाढता रक्तदाब ही बाब समोर आली आहे. वर्षभरात झालेल्या बाल स्वस्थ अभियानात तपासणी व नियमित उपचारात केलेल्या निरीक्षणात १८ वर्षाखालील मुलांत पूर्व रक्तदाब व उच्च रक्तदाबाची लक्षणे दिसून येत आहेत.

जिल्हाभरात ४६ शालेय विद्यार्थ्यांवर हृदयशस्त्रक्रिया करण्याची वेळ आली आहे. बाल स्वास्थ अभियानात शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्यातून देशभरातील शालेय मुलांच्या आरोग्याची स्थिती केंद्र सरकारकडे एकत्रित होते. या नोंदीतून वरील बाब पुढे आली आहे. हृदयविकारतज्‍ज्ञ डॉ. अक्षय बाफना म्हणाले, ‘‘जगभरातील बालकांत पूर्व उच्च रक्तदाबाचे प्रमाण १६.३ टक्के, तर भारतात ११.२ टक्के आहे. महाराष्ट्रात १३.२ तर कोल्हापुरातही सरासरी १३.१ प्रमाण आहे. संशोधक डॉ. अनिता सक्सेना यांनी केलेल्या संशोधनात देशातील दहा

मुलांमागे दोन मुलांना रक्तदाबाशी संबंधित लक्षणे आहेत. बालकांच्या वाढत्या रक्तदाबाकडे वेळीच लक्ष देणे महत्त्‍वाचे आहे. अशा रुग्णांत किडनीच्या आजारांची लक्षणे दिसतात, तेव्हा अनेकदा नियमित बाब म्हणून दुर्लक्ष केले जाते. वास्तविक बालकांच्या भविष्याच्‍यादृष्टीने हे दुर्लक्ष महागात पडणारे आहे.’’

बालकांतील पूर्व उच्च रक्तदाब व रक्तदाबाची काही लक्षणे वेळीच ओळखून योग्य त्या तपासण्या करणे. गरजेनुसार उपचार घेणे आवश्यक असते. अन्यथा भविष्यात हृदयाकडे जाणाऱ्या रक्त वाहिन्यात अडथळे निर्माण होऊन हृदयविकार जडतो. यातून मुलांना दम लागणे, कष्टाचे काम करता न येणे, ते क्रय शक्ती कमी होणे अशी लक्षणे दिसतात. वाढते वय व शरीराच्या आकाराबरोबर हृदयविकाराची वाढती लक्षणे जीवघेणी ठरू शकतात. बालकांचा पूर्व उच्च रक्तदाब किंवा रक्तदाब वाढू नये यासाठी काळजी घेणे महत्त्‍वाचे ठरते, असेही डॉ. बाफना यांनी सांगितले.

कारणे अशी :

बदलत्या जीवनशैलीत जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. व्यायामाचा अभाव आहे. इंटरनेट मोबाईलचा वाढत्या वापरात अति जागरण करणे, एकाच ठिकाणी सतत बसून राहणे. अतिनिवांतपणा यात मुलांना पूर्व उच्च रक्तदाब किंवा रक्तदाबाची लक्षणे दिसतात.

उपाय योजना अशा :

  • रोज किमान ४० मिनिटे व्यायाम करणे

  • संतुलित व घरगुती आहार घेणे वेळेवरच घेणे

  • मैदानी खेळ खेळणे किंवा योगासने करणे