वाशिष्ठी-शिवदीने ओलांडली धोक्याची पातळी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

बहादूर शेख नाका येथील वाशिष्ठी नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. कालुस्ते, गोंधळे, परशुराम घाटात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. पुराच्या धोक्यामुळे शहर व परिसरातील शाळा-महाविद्यालयांना आज (सोमवार) सुट्टी देण्यात आली आहे. 

चिपळूण : शहर आणि परिसरात रात्रभर सुरू असलेल्या पावसाने वाशिष्ठी व शिवदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरात बाजारपेठेसह विविध भागात पाणी घुसले. पालिकेने भोंगा वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

दरम्यान, बहादूर शेख नाका येथील वाशिष्ठी नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. कालुस्ते, गोंधळे, परशुराम घाटात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. पुराच्या धोक्यामुळे शहर व परिसरातील शाळा-महाविद्यालयांना आज (सोमवार) सुट्टी देण्यात आली आहे. 

वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने शहरातील बाजारपेठेत पाणी घुसले आहे. बाजारपेठेसह भेंडी नाका, चिंचनाका, बसस्थानक, चिंचनाका बहादूर शेख मार्गावरील अनंत आईस फॅक्टरी, वडनाका, शंकरवाडी रोड, जिप्सी कॉर्नर, उक्ताड आदी परिसरात सकाळीच पाणी भरले होते. मुंबई-गोवा महामार्गावर प्रांत कार्यालय परिसरातही पाणी साचले होते.

दरम्यान, वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने ब्रिटिशकालीन वाशिष्ठी पूल वाहतुकीस बंद करण्यात आला. बायपासमार्गे वाहतूक वळवण्यात आली होती. बायपास मार्गावर खेंड-बावशेवाडी मार्गावर शिवनदीचे पाणी आले होते. सुमारे फूटभर पाणी असल्याने येथून वाहतूक सुरू होती. तर महामार्गावर पॉवर हाऊस येथेही नाल्याचे पाणी पॉवर हाऊस ते बसस्थानक दरम्यानच्या रस्त्यावर आले होते. तालुक्यातील कालुस्ते खुर्द येथे दरड कोसळून तीन घरांचे नुकसान झाले. काही घरांमध्ये पुराचे पाणी आल्याने ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

रामपूर गोंधळे मार्गावरील गोंधळे-बौद्दवाडी थांबा येथे दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली. अडरे अनारी रस्त्यावरील पुलावर पुराचे पाणी आल्याने पहाटेपासून वाहतूक ठप्प करण्यात आली आहे. रात्रीपासून पावसाचा जोर कायम राहिल्याने शहर व परिसरातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. खेर्डीसह चिंचघरीतही काही ठिकाणी पुराचे पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळित झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vashishthi and Shivdi crosses the danger level alert to Citizen