हर्णैत पर्यटकांच्या गाड्या भरतीमुळे समुद्रात

हर्णैत पर्यटकांच्या गाड्या भरतीमुळे समुद्रात

हर्णै - पौर्णिमेमुळे समुद्राला आलेल्या उधाणात येथील किनाऱ्यावर लावलेल्या पर्यटकांच्या तीन गाड्या आज समुद्रात बुडाल्या, मात्र ग्रामस्थांच्या मदतीने तिन्ही गाड्या बाहेर काढण्यात पर्यटकांना यश आले. या हंगामातच नव्हे, तर हर्णैत पहिल्यांदाच असा प्रकार घडला.

दिवाळीच्या सुट्या संपता-संपता पुन्हा या आठवड्यात ईद, गुरू नानक जयंती आणि रविवारला जोडून चौथा शनिवार अशा सलग सुट्या आल्याने कोकण किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी पुन्हा वाढली. दापोली तालुक्‍यात आलेला पर्यटक हा मासळी खरेदीसाठी हर्णै बंदरात आल्याशिवाय राहत नाही. आज सकाळी साडेआठला सुरू झालेल्या मच्छी मार्केटला पर्यटकांनी मासळी खरेदीसाठी गर्दी केली होती. बंदरात खरेदीसाठी येणारे पर्यटक कशीही आणि कुठेही आपली वाहने उभी करतात. आज सकाळी काही पर्यटकांनी चक्क समुद्रालगतच वाहने उभी करून मच्छी खरेदी सुरू केली होती. हे पर्यटक मच्छी खरेदीत इतके गुंग झाले, की टेम्पो ट्रॅव्हलर व दोन मोटार समुद्राच्या उधाणात बुडाल्या. 

ग्रामस्थ आणि मच्छीमारांनी गाड्या पाण्याखाली गेल्याबाबत ओरड केल्यानंतर पर्यटकांचे गाड्यांकडे लक्ष गेले. एक छोटी मोटार सर्व ग्रामस्थांनी मिळून ढकलून बाहेर काढली; तर दुसरी मोटार स्थानिक मल्लू यादव व नंदकुमार शिंदे यांच्या बैलगाडीला दोर बांधून बाहेर काढण्यात आली. टेम्पो ट्रॅव्हलरसाठी तातडीने गावातील ट्रॅक्‍टर मागविण्यात आला. त्याला मोठा दोर बांधून टेम्पो बाहेर काढण्यात आला. 

पर्यटकांच्या आततायीपणामुळे
ग्रामस्थ सांगत असतानाही पर्यटकांच्या आततायीपणामुळे असे प्रकार घडतात. दरम्यान, समुद्रावर गाड्या पार्क करण्यामुळे जर असे प्रकार होत असतील तर पर्यटकांच्या गाड्या समुद्रालगत पार्क करू नयेत. गावात ग्रामपंचायतीने विशिष्ट जागा ठरवून पार्किंग सुविधा देणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com