मालवणात विक्रेत्यांचा स्थलांतरास विरोध, पालिकेवरही आरोप

प्रशांत हिंदळेकर
Sunday, 20 September 2020

उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांची भेट घेऊन गर्दीच्या नावाखाली नगरपालिका विक्रेत्यांना नाहक त्रास देत असल्याचा आरोप करत स्थलांतरास विरोध असल्याचे सांगितले. 

मालवण (सिंधुदुर्ग) - शहरात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने बाजारपेठेतील गर्दी कमी करण्यासाठी भाजी व फळ विक्रेत्यांना मामा वरेरकर नाट्यगृह परिसरात बसण्याचे आदेश नगरपालिका मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी दिल्यानंतर विक्रेत्यांनी स्थलांतरित ठिकाणी बसण्यास तीव्र विरोध दर्शविला. उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांची भेट घेऊन गर्दीच्या नावाखाली नगरपालिका विक्रेत्यांना नाहक त्रास देत असल्याचा आरोप करत स्थलांतरास विरोध असल्याचे सांगितले. 

शहरातील सर्व भाजी व फळ विक्रेत्यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर गर्दी टाळण्यासाठी सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्‍यक असल्याने तसेच दिवसेंदिवस शहरात कोविड रुग्ण वाढत असल्यामुळे कोणत्याही भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावर बसून तसेच हातगाडीवर भाजी, फळ विक्री करू नये, याकरिता 21 सप्टेंबरपासून सर्व भाजी व फळ विक्रेत्यांनी सोमवार पेठ बाजारात न बसता मामा वरेरकर नाट्यगृह येथे बसून आपला व्यवसाय करायचा आहे, असे निर्देश मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी दिले आहेत; मात्र भाजी, फळ व फुल विक्रेत्यांनी या निर्णयास तीव्र विरोध दर्शविला आहे. याबाबत आज विक्रेते पालिकेत नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची भेट घेण्यास गेले असता ते अनुपस्थित असल्याने उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांची भेट घेतली. नगराध्यक्ष कांदळगावकर यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून भेट घेण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी बैठकीत असल्याचे सांगून फोन कट केला, असे भाजी विक्रेते सरदार ताजर यांनी सांगितले.

नगराध्यक्षांनी भेट न दिल्याने भाजी विक्रेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आपली कैफियत उपनगराध्यक्ष वराडकर यांच्याकडे मांडली. यावेळी आशा फर्नांडिस, शकुंतला टेम्बुलकर, मंगल गावकर, शकुंतला कोरगावकर, सरदार ताजर, कासीम बागवान, शफी खान, रहीम मुल्ला, निलेश तळगावकर, बाया धुरी, इम्रान मुजावर, भाईजान खान, आर्यन खवणेकर, शब्बीर अथनिकर आदी 25 ते 30 भाजी, फळ व फुल विक्रेते उपस्थित होते. 

गणेश चतुर्थी काळात नाट्यगृह परिसरात भाजी विक्रेत्यांना बसविण्यात आले होते; मात्र त्याठिकाणी त्यांचा व्यवसाय झाला नाही. सद्यस्थितीत बाजारात गर्दी कमी असल्याने विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शहरात कोरोना 5 टक्के आहे आणि पालिका गर्दीचे कारण सांगून विक्रेत्यांना 95 टक्के त्रास देत आहे. कोरोना संक्रमणात योग्य ती काळजी विक्रेत्यांकडून घेतली जात असताना पालिका प्रशासनाकडून विक्रेत्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असा आरोप विक्रेत्यांनी केला. 

प्रशासनाला टोला 
पुढील पालिका निवडणुकीत निवडून यायचे असेल तर आम्हाला आमच्या रोजच्या जागीच बसू द्यावे असा टोला महिला भाजी विक्रेत्यांनी लगावला. नाट्यगृह परिसरात बसण्यास आमचा ठाम विरोध असून 21 सप्टेंबरपासून आम्ही त्याठिकाणी बसणार नाही अशी भूमिका यावेळी विक्रेत्यांनी मांडली. 

प्रशासन अडचणीत 
दरम्यान, शहरात वाढत्या रुग्णांमुळे पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. यासाठी विविध उपाययोजना प्रशासनाकडून राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकीकडे शहरात कर्फ्यूस व्यापाऱ्यांनी विरोध केला असतानाच गर्दी कमी करण्यासाठी विक्रेत्यांना दुसऱ्या जागेत स्थलांतरित करण्याच्या निर्णयासही विरोध होत असल्याने प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे पालिका प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vendors oppose migration in Malwana