वेंगुर्लेत विद्यार्थी बनले स्वच्छतादूत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016

रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी घाण करणार नाही, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपणाकडूनही आपल्या शहराचा नावलौकीक वाढविण्यासाठी हातभार लागावा, हीच अपेक्षा, अशा आशयाची पत्रे विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांनी पाठविली आहेत.

वेंगुर्ले - देशामध्ये हागणदारीमुक्त शहर म्हणून नावलौकीक कमावलेल्या वेंगुर्ले शहरातील स्वच्छता व हांगणदारीमुक्तीमध्ये सातत्य टिकवून राहण्यासाठी पालिका मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी पावले उचलली आहेत. त्यांनी पालिकेच्या वतीने शहरातील 13 प्राथमिक शाळांमध्ये स्वच्छता अभियानाअंतर्गत आई-बाबांना त्यांच्या पाल्यांनी पत्र लिहिण्याचा उपक्रम राबविला. याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरातील सुमारे 1500 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.

मुलांच्या संस्कारातून स्वच्छतेचे संस्कार रुजविणे व मुलांकडून पालकांना स्वच्छतेविषयी विनंती केली, तर त्यामध्ये चांगला बदल घडून येऊ शकतो. याची कल्पना मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना आल्यानंतर त्यांनी शहरातील 13 प्राथमिक शाळांमध्ये पालिकेच्या वतीने स्वच्छतेचा उपक्रम राबविण्याचे ठरविले. त्यानुसार सुमारे 1500 विद्यार्थ्यांना पालिकेतर्फे पोस्टकार्ड पुरविण्यात आली व आई-वडिलांना स्वच्छतेचे महत्त्व पटविण्याकरिता मजकूर लिहिण्यास सांगितले. त्याला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषेत आपल्या आई-बाबांना स्वच्छता राखण्याचे आवाहन केले.

स्वच्छता अभियानामध्ये आमचे वेंगुर्ले शहर देशातील दहा शहरांमध्ये अग्रगण्य शहर म्हणून गणले गेले आहे. बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव झाला असून, आपल्या शहराला याचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आपण कचरा चतुःसूत्रीप्रमाणे वर्गीकरण करून घंटागाडीत टाकावा. शाळेतील, घरातील कचरा कुठेही रस्त्यावर टाकणार नाही. रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी घाण करणार नाही, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपणाकडूनही आपल्या शहराचा नावलौकीक वाढविण्यासाठी हातभार लागावा, हीच अपेक्षा, अशा आशयाची पत्रे विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांनी पाठविली आहेत. मुख्याधिकारी कोकरे यांच्या या उपक्रमाबद्दल शहरवासीयांकडून अभिनंदन होत आहे.

शहर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी मुख्याधिकरी रामदास कोकरे यांनी राबविलेल्या उपक्रमांची आता देशपातळीवर दखल घेतली जाऊ लागली आहे. त्यांना मार्गदर्शनासाठी ठिकठिकाणी निमंत्रित करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्र संघ विकास कार्यक्रमाअंतर्गत 4 व 5 ऑक्‍टोबरला झारखंड राज्यातील साहीबगॅज येथे स्वच्छता उपक्रमाअंतर्गत कार्यशाळा आयोजित केली असून, या कार्यशाळेत वेंगुर्ले शहर स्वच्छता अभियानाअंतर्गत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी कोकरे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

Web Title: vengurla student make a clean village