वेंगुर्ले उपनगराध्यक्षपदी राऊळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

वेंगुर्ले - येथील पालिकेच्या आज झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडीत शिवसेना, भाजप, अपक्ष युतीच्या उमेदवार अस्मिता राऊळ या ४ मतांनी विजयी झाल्या.

वेंगुर्ले - येथील पालिकेच्या आज झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडीत शिवसेना, भाजप, अपक्ष युतीच्या उमेदवार अस्मिता राऊळ या ४ मतांनी विजयी झाल्या.

उपनगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या शीतल आंगचेकर व शिवसेनेच्या अस्मिता राऊळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शीतल आंगचेकर यांना ६ तर अस्मिता राऊळ यांना १० मते मिळाल्याने अस्मिता राऊळ विजयी झाल्याचे सभेचे अध्यक्ष पीठासन अधिकारी दिलीप गिरप यांनी जाहीर केले; तर स्वीकृत नगरसेवकपदी शिवसेना-भाजपच्या वतीने संदेश निकम व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे आत्माराम सोकटे यांची निवड झाली. येथील पालिकेत नगराध्यक्ष व सहा नगरसेवक हे भाजपचे, शिवसेना व राष्ट्रवादी प्रत्येकी एक, काँग्रेस सात तर अपक्ष दोन असे संख्याबळ आहे. 

आज झालेली उपनगराध्यक्षपदाची निवड बिनविरोध होण्याची चिन्हे असताना या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून आंगचेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक घ्यावी लागली. यात शिवसेना-भाजप-अपक्ष युतीचे उमेदवार राऊळ यांना नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजपचे नगरसेवक प्रशांत आपटे, साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर, धर्मराज कांबळी, सुहास गवंडळकर, नागेश गावडे, अपक्ष नगरसेवक तुषार सापळे, सुमन निकम यांनी मतदान केले. काँग्रेसच्या शीतल आंगचेकर यांना कृपा गिरप, विधाता सावंत, महेश डिचोलकर, कृतिका कुबल, पूनम जाधव यांनी मतदान केले. काँग्रेसच्या स्नेहल खोबरेकर या गैरहजर व राष्ट्रवादीचे नगरसेवक शैलेश गावडे हे तटस्थ राहिल्याने अखेर शिवसेनेच्या अस्मिता राऊळ या चार मतांनी विजयी झाल्या. 

उपनगराध्यक्षपदी राऊळ या निवड झाल्यानंतर नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्यासह सर्व नगरसेवक व भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई, सनी मोरे, बाळू प्रभू, वृंदा गवंडळकर तर शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश नाईक, शहरप्रमुख विवेक आरोलकर, सुरेश भोसले, आनंद बटा, सुनील वालावलकर, डेलिन डिसोजा, गजू गोलतकर, वृंदा मोर्डेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन राऊळ यांचे अभिनंदन केले. तसेच स्वीकृत नगरसेवक संदेश निकम, आत्माराम सोकटे यांचेही उपस्थितांनी अभिनंदन केले.

Web Title: vengurle dy. mayor asmita raul