वेंगुर्लेत काँग्रेसला नाराजी भोवली

संजय मालवणकर - सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

वेंगुर्ले - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला नाराजीचा मोठा फटका बसला. यामुळे पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. शिवसेनेने मात्र तालुक्‍यात मुसंडी मारली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्वच तालुक्‍यात हरवले. निवडणुकीत भाजप मात्र घरोघरी पोचला.

वेंगुर्ले - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला नाराजीचा मोठा फटका बसला. यामुळे पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. शिवसेनेने मात्र तालुक्‍यात मुसंडी मारली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्वच तालुक्‍यात हरवले. निवडणुकीत भाजप मात्र घरोघरी पोचला.

तालुक्‍यात २०१२ च्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मात्र तालुक्‍यात शिवसेनेची ताकद वाढली. त्यांच्यासोबत अनेक लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ पैकी ४ पंचायत समिती सदस्य केसरकर यांच्यासमवेत शिवसेनेत दाखल झाले. यामध्ये सभापती सुचिता वजराठकर, माजी सभापती सुनील मोरजकर, पंचायत समिती सदस्या प्रणाली बंगे व उमा मठकर यांचा समावेश होता. जिल्हा परिषदेच्या ३ सदस्यांपैकी राष्ट्रवादीच्या योगिता परब व सुकन्या नरसुले यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

वेंगुर्ले पंचायत समिती निवडणुकीत १० पैकी शिवसेनेचे ५ उमेदवार निवडून आले. यामुळे पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला. राष्ट्रीय काँग्रेसचे ४ सदस्य निवडून आले. भाजपच्या स्मिता दामले या एकमेव उमेदवार निवडून आल्या. सभापती व उपसभापतीच्या निवडणुकीत कोणताही धोका होऊ नये यासाठी शिवसेना भाजपचा पाठिंबा घेण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास भाजपला उपसभापती पद बहाल करावे लागेल. नगरपरिषदेत भाजपचा नगराध्यक्ष आहे, तर शिवसेनेचे एकमेव नगरसेविका असलेली अस्मिता राऊळ या उपनगराध्यक्ष आहेत. हाच फॉर्म्युला वापरून पंचायत समितीवर शिवसेना-भाजप युतीची सत्ता राहणार आहे. 

शिवसेनेने भाजपचा पाठिंबा घेतला नाही तर भाजप काँग्रेसला बाहेरून पाठिंबा देण्याची शक्‍यता आहे. किंवा भाजप तटस्थ राहू शकते. जर भाजपने काँग्रेसला बाहेरून पाठिंबा दिला तर सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेना व काँग्रेस यांची समसमान म्हणजे ५-५ मते होतील व चिठ्ठीवर सभापती, उपसभापती यांची निवड होईल. त्यामुळे शिवसेना कोणताही धोका पत्करू शकत नाही. भाजपला उपसभापती पद हे शिवसेनेला बहाल करावेच लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे १० पैकी केवळ ४ सदस्य पंचायत समितीमध्ये निवडून आले आहेत. तुळस जिल्हा परिषद मतदारसंघ व त्यामध्ये येणाऱ्या तुळस व मातोंड या दोन पंचायत समिती मतदारसंघात काँग्रेसने दिलेल्या उमेदवारावरून काँग्रेसलमध्ये नाराजी होती. त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसला. त्यामुळे तुळस जिल्हा परिषदेची एक व त्या प्रभागातील मातोंड व तुळस हे दोन पंचायत समिती मतदारसंघ काँग्रेसच्या हातून गेले व काँग्रेस पंचायत समितीच्या सत्तेपासून दूर राहिली.

उभादांडा जिल्हा परिषद मतदारसंघ हा खुला प्रभागासाठी होता. त्या ठिकाणी शिवसेनेकडून उभादांडा शिवसेना विभागप्रमुख रमेश नार्वेकर यांनी उमेदवारी मागितली होती; मात्र शिवसेनेने जिल्हा परिषद सदस्य सौ. सुकन्या नरसुले यांना उमेदवारी दिली. नार्वेकर यांनी बंडखोरी करून निवडणूक लढविली. थोडक्‍या मतांनी त्यांचा पराभव झाला. नार्वेकर यांच्या बंडखोरीचा फायदा काँग्रेसला झाला व त्या ठिकाणी काँग्रेसचे विष्णूदास कुबल निवडून आले. याच प्रभागातील उभादांडा व आसोली या दोन्ही पंचायत समिती मतदारसंघातून मात्र शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झाले.

म्हापण जिल्हा परिषद संघात काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले माजी उपसभापती सुनील म्हापणकर हे विजयी झाले. दुसरे काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य विकास गवंडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढविली. काँग्रेसचे म्हापणकर व गवंडे हे दोघे ज्येष्ठ नेते काँग्रेसमधून बाहेर पडल्याने काँग्रेसकडे असलेला म्हापण जिल्हा परिषद मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात गेला. काँग्रेसचे माजी पंचायत समिती सभापती नीलेश सामंत, जिल्हा परिषद सदस्य वंदना किनळेकर यांच्या प्रतिष्ठेची होती. मात्र, याच प्रभागातील म्हापण पंचायत समिती मतदारसंघ काँग्रेसला आपल्याकडे ठेवण्यात यश आले. परुळे मतदारसंघ राष्ट्रवादीकडून शिवसेनेने आपल्याकडे हिसकावून घेतला. म्हापण जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादीला उमेदवारही मिळू शकला नव्हता तर म्हापण व परुळे या दोन पंचायत समिती मतदारसंघात राष्ट्रवादी व भाजपला मिळाला नव्हता. त्यामुळे दोन्ही ठिकाणी काँग्रेस व शिवसेना अशी दुरंगी लढत झाली होती.

आडेली जिल्हा परिषद मतदारसंघ काँग्रेसने राष्ट्रवादीकडून आपल्याकडे हिसकावून घेतला. या ठिकाणी राष्ट्रवादीला उमेदवारही मिळू शकला नव्हता. शिवसेनेपेक्षा भाजपने या ठिकाणी मतांची आघाडी घेतली आहे. या प्रभागातील आडेली पंचायत समिती मतदारसंघ काँग्रेसने जिंकला. मागील निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने काँग्रेसशी बंडखोरी करून निवडणूक लढविलेले स्वप्नील चमणकर हे विजयी झाले होते; मात्र त्यानंतर ते काँग्रेस पक्षासोबत राहिल्याने उपसभापतीपदी विराजमान झाले होते. काँग्रेसच्या विजयी उमेदवाराच्या वाट्यात श्री. चमणकर यांचा सिंहाचा वाटा होता. वायंगणी पंचायत समिती राष्ट्रवादीकडून भाजपने आपल्या ताब्यात घेतली. 
तुळस जिल्हा परिषद मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होता. या वेळी शिवसेनेने तो आपल्या ताब्यात घेतला. या प्रबागातील तुळस व मातोंड हे दोन्ही पंचायत समिती मतदारसंघ शिवसेनेकडे राहिले. तुळस पंचायत समिती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रसच्या सभापती सुचिता वजराठकर या निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मातोंड पंचायत समिती मतदारसंघ हा काँग्रेसच्या ताब्यात होता; मात्र या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याने या नाराजीचा फटका काँग्रेसला बसला. हा मतदारसंघ शिवसेनेने काबीज केला.

उभादांडा जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेला बंडखोरीचा फटका बसला. शिवसेनेच्या मतदारांनी आपली नाराजी मतदानातून व्यक्त केली. मात्र याच शिवसेनेच्या मतदारांनी याच प्रभागातील उभादांडा व आसोली या दोन पंचायत समिती मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारांना साथ दिली. राष्ट्रवादीकडे असलेले दोन्ही मतदारसंघ शिवसेनेने आपल्याकडे खेचून आणले. माजी जिल्हा परिषद सदस्य सुकन्या नरसुले, माजी सभापती अभिषेक चमणकर, माजी सबापती सारिका काळसेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मकरंद परब यांना पराभव स्वीकारावा लागला.

रेडी जिल्हा परिषद संघ व या प्रभागातील रेडी व शिरोडा हे दोन्ही पंचायत समिती मतदारसंघ काँग्रेसने जिंकले. यामध्ये काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. निकिता परब यांचा मोठा वाटा आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व माजी पंचायत समिती सदस्य अजित सावंत, सिंधुदुर्ग बॅंकेचे संचालक राजन गावडे यांचा पराभव झाला. रेडी पंचायत समिती मतदारसंघ हा काँग्रेसच्या ताब्यात होता. काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्य सौ. चित्रा कनयाळकर यांनी सदस्य असताना रेडी गावात केलेल्या विकासकामांचा फायदा काँग्रेसला झाला.

Web Title: Vengurleta Congress displeasure