काही सुखद...सिंधुदुर्गातील रुग्णांना मिळाला आधार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020

यामुळे त्याचा फैलाव रोखण्यासाठी आवश्‍यक काळजी घेणे हाच या संदर्भातील महत्त्वाचा उपाय मानला जातो.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर झाल्यास व्हेंटीलेटर यंत्रणा रुग्णाचे प्राण वाचवणारी ठरत असल्याने या आणिबाणीच्या काळात अशी यंत्रणा उभारणीसाठी सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत. सिंधुदुर्गातही चार नवे व्हेंटीलेटर दाखल झाल्याने याची जिल्ह्यातील संख्या अकरावर गेली आहे. 

"कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्गात याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासन पूर्ण ताकतीने प्रयत्न करत आहेत. जिल्ह्याची आरोग्ययंत्रणा मुळातच कमजोर आहे. यात अपुरी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी संख्या सक्षम यंत्रण सामुग्रीचा अभाव आदी प्रश्‍न या आधीपासूनच गंभीर आहेत. यामुळे त्याचा फैलाव रोखण्यासाठी आवश्‍यक काळजी घेणे हाच या संदर्भातील महत्त्वाचा उपाय मानला जातो.

कोरोना पसरला तर मोठ्या प्रमाणात व्हेंटीलेटरची आवश्‍यकता भासते; मात्र जिल्ह्यात याआधी अवघे सात व्हेंटीलेटर होते. आता आणखी चार नवे व्हेंटीलेटर आणले आहेत. कोरोनामुळे व्हेंटीलेटर यंत्रणा जागतीकस्तरावर चर्चेत आहेत. व्हेंटीलेटरची संख्या कमी पडल्यामुळे इटलीत कोणावर उपचार करायचे याचा प्राधान्यक्रम ठरवण्याची नामुष्की तेथील यंत्रणेवर आली आहे. जागतीक स्तरावर चांगल्या वैद्यकीय सुविधा असलेल्या देशाची अशी स्थिती झाली आहे.

भारतात देशभरात साधारण 48 हजार व्हेंटीलेटर आहेत. त्यातील महाराष्ट्रात 3 हजार 363 तर एकट्या मुंबईत 800 व्हेंटीलेटर आहेत. कोरोनामुळे या यंत्रणेची गरज ठळक झाली आहे. यामुळे व्हेंटीलेटरची संख्या वाढवण्याचा प्रयत्न देशस्तरावर सुरू आहे. केंद्राने कोरोना विरोधात लढण्यासाठी पहिल्या टप्प्यात आरोग्यविभागाला दिलेल्या 15 हजार कोटींमधून व्हेंटीलेटरसाठीही आथिक तरतूद केली गेली आहे; मात्र मुळात ही यंत्रणा बनवणाऱ्यांची संख्या आणि क्षमता मर्यादित आहेत. एका व्हेंटीलेटरची किंमत दीड लाखाच्या घरात असते.

महाराष्ट्रात कमी किंमतीत व्हेंटीलेटर बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र मुळातच जगभरात सर्वसाधारणपणे वर्षाला 1 लाख व्हेंटीलेटरची निर्मिती होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अचानक या यंत्रणेची गरज ठळक झाल्याने आता इस्त्रो, मारुती सुझुकी आदी मोठ्या कंपन्या देशाची गरज लक्षात घेऊन व्हेंटीलेटर निर्मितीसाठी आपली ताकद लावत आहेत. यावरून या यंत्रणेला अचानक किती महत्त्व आले हे लक्षात येते. 

नियमांचे पालन हवे 
जिल्ह्याचा विचार करता सध्या उपलब्ध 11 पैकी 8 व्हेंटीलेटर जिल्हा रुग्णालयात, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात 2, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात 1, व्हेंटीलेटर उपलब्ध आहे. नव्याने आलेले चारही व्हेंटीलेटर जिल्हा रूग्णालयाला देण्यात आले आहेत. एकूण स्थिती पाहता व्हेंटीलेटरची संख्या वाढवायला मर्यादा आहेत. यामुळे कोरोना फैलावू नये यासाठी सिंधुदुर्गवासीयांनीच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे. 

व्हेंटीलेटर कुठे किती? 
- भारत - 48,000 
- महाराष्ट्र 3,363 
- मुंबई 800 
- सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय 8 
- कणकवली उपजिल्हा रुग्णालय 2 
- सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय 1  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ventilator facilities konkan sindhudurg