प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांना पुलोत्सव सन्मान पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 डिसेंबर 2018

रत्नागिरी - आर्ट सर्कलचा ‘पुलोत्सव’ 7 ते 9 डिसेंबर दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात रंगणार आहे. यंदा पुलोत्सव सन्मान पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांना दिला  जाणार आहे.

रत्नागिरी - आर्ट सर्कलचा ‘पुलोत्सव’ 7 ते 9 डिसेंबर दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात रंगणार आहे. यंदा पुलोत्सव सन्मान पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांना दिला  जाणार आहे.

ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या हस्ते आणि आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन होईल.  यंदा पुलंचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने 8 नोव्हेंबरला आर्ट सर्कलने दीपोत्सवाने प्रारंभ केला. रत्नागिरीचे जावईबापू असलेल्या पुलंना पुलोत्सवातून गेली दहा वर्षे रसिकांची मानवंदना मिळतच आहे.

पुरस्कार सोहळ्यानंतर सुप्रिया चित्राव गोखले यांच्याशी संवाद साधतील. मराठी रंगभूमीवरचा राजबिंडा आणि देखणा कलाकार, सामाजिक भान राखूनही त्याबद्दल क्वचित बोलणारे गोखले दिलखुलास गप्पा मारणार आहेत. विनोदी लेखक, काव्य, चिंतन, सामाजिक भान यावर लेखन करणार्‍या पु. ल. देशपांडे यांच्यावरील ‘अपरिचित पुल’ कार्यक्रम सतिश आळेकर आणि चंद्रकांत काळे व गिरीश कुलकर्णी सादर करतील. फास्टर फेणेमधील अप्पा म्हणजे गिरीश कुलकर्णी पुलंच्या अपरिचित पैलूंविषयी अधिक माहिती सांगणार आहेत.

रशियन नाटककार व्हॅलदलीन दोझोत्सेव यांच्या पुलंनी रूपांतरित केलेल्या ‘एक झुंज वार्‍याशी’ हे नाटक सादर होईल. मूळ रशियन नाटकाचे पुलंनी चपखलपणे भारतीय परंपरा आणि राजकीय प्रवाहाचा वापर केला आहे. शाब्दिक भाषांतर नव्हे तर आशय आणि गाभा तसाच ठेवला. हे नाटक सामाजिक, राजकीय आणि वैचारिक भूमिकांचा सजगपणे विचार करण्यासाठी प्रेरक आहे. त्याचे संदर्भ आजही टिकून आहेत. 8 डिसेंबरला रात्री साडेनऊ वाजता हे नाटक सादर होईल. दिग्दर्शन सचिन जोशी आणि कलाकार राजेश देशमुख, सुनील अभ्यंकर, मंजिरी साने, डॉ. विवेक बेळे आहेत. याच दिवशी सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

व्यंगचित्रांचे प्रदर्शन

पुलकित रेषा नावाचे पुलंसदर्भातील व्यंगचित्रांचे प्रदर्शन सावरकर नाट्यगृहात भरवण्यात येणार आहे. त्याचे 7 डिसेंबरला होईल. 8 ला सकाळी 10 वाजता नाट्यगृहातच व्यंगचित्र प्रात्यक्षिक प्रसिद्ध चित्रकार व ‘चिंटू’फेम चारुहास पंडित देणार आहेत.

Web Title: Veteran actor Vikram Gokhale received the Pulotsav Samman Award