कोकणात आधुनिक शेतीला प्राधान्य

कोकणात आधुनिक शेतीला प्राधान्य

कुडाळ - कोकणातील शेतीला आधुनिक व्यावसायिक शेतीकडे वळविण्याला माझ्या कारकीर्दीत प्राधान्य असेल. तरुणांना कृषी क्षेत्राकडे वळविण्यावर भर देणार आहे. सिंधुदुर्गातील तरंदळे (ता. कणकवली) येथे सिंचनक्षेत्र अंतर्गत उसाच्या व्यापक लागवडीचा प्रयोग यशस्वी केला जाईल, असे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी सांगितले. मूळ सिंधुदुर्गातील असलेल्या सावंत यांनी आज सिंधुदुर्गातूनच कुलगुरुपदाचा कार्यभार स्वीकारला.

कोकण कृषी विद्यापीठाला दीर्घकाळ कुलगुरूची प्रतीक्षा होती. याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण होऊन डॉ. सावंत यांची नियुक्‍ती झाली. ते येथे आले होते. त्यांनी सिंधुदुर्गातूनच विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारला. येथील हॉटेल लेमनग्रासमध्ये त्यांची भेट घेतली असता त्यांनी ‘सकाळ’शी दिलखुलास संवाद साधला.

ते म्हणाले, ‘‘मी मूळ तरंदळे (ता. कणकवली) येथील आहे. आज मी कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारला. कोकणातील शेतीला आधुनिक रूप आणि प्राधान्य कसे देता येईल, या दृष्टिकोनातून माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. कोकणसाठी काम करण्याची संधी या पदामुळे मला मिळाली आहे. तरंदळे गावात सिंचन क्षेत्र मोठे आहे. या सिंचन क्षेत्राखाली उसाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्याचा माझा प्रयत्न आहे. आता माझा भाऊ अनंत सावंत यांनी प्रयोग केला आहे. तो मला मोठा करायचा आहे. कोकणात व्यावसायिक शेतीला मोठ्या प्रमाणात संधी आहे. शेती व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञान वापरून आर्थिक क्रांती करू शकतो. कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो; मात्र या पाण्याचा विनियोग योग्य प्रकारे होत नसल्यामुळे भविष्यात आपण पाण्याचा वापर योग्य प्रकारे कसा करावा, या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे.’’

ते म्हणाले, ‘‘पुणे येथे होणाऱ्या नर्सरी उद्योगासाठी आपल्या कोकणातील लाल माती पुण्यामध्ये जाते. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पॉलीहाउस निर्माण करतात. पुण्यातून झाडे देशभर जातात; मात्र ज्या कोकणातून आपली लाल माती पुण्यात जाते त्याचे महत्त्व आपल्या कोकणातील लोकांना माहीत नाही. भविष्यात त्याची माहिती करून त्यांनी नर्सरी व्यवसाय उद्योगाकडे वळावे, यासाठी प्रयत्न केले जातील. पुण्यात या उद्योगातून काही कोटींची उलाढाल होत आहे. हे सर्व करताना ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. तळेगाव-दाभाडेसारख्या भागात चाळीस ते पन्नास एकर क्षेत्रांत पॉलिहाउसेस आहेत. कोकणात आपल्याकडे योग्य वातावरण असताना सुद्धा याकडे दुर्लक्ष करतो. व्यावसायिक शेतीची संकल्पना कोकणात रुजवण्यासाठी मी कोकणचा सुपुत्र म्हणून प्रयत्न करणार आहे.’’

ते म्हणाले, ‘‘आज मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग शेती क्षेत्राकडे वळत आहे. ही निश्‍चितच आनंदाची बाब आहे. तरंदळे येथे ऊसशेती करताना आंतरपीक घेण्यासाठी प्रयत्न राहणार आहे. उसातील तज्ज्ञ डॉ. डी. जी. हापसे यांना घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली उसामध्ये शेतकरी आर्थिक सक्षम कसा होईल, या दृष्टीने काम करायचे आहे.’’ 

माझ्याकडे कुलगुरुपदाची जबाबदारी आली आहे. हे फार मोठे पद आहे. त्या माध्यमातून कोकणात शेती क्षेत्राला प्राधान्य देईन. वेंगुर्ले फळसंशोधन केंद्रात आणखी संशोधन होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे.
- डॉ. संजय सावंत,
कुलगुरू, 
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com