भारत- अफगाणिस्तान क्रिकेट सामन्याचा असाही बळी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जून 2019

संगमेश्वर - भारत विरूध्द अफगाणिस्तान क्रिकेट सामन्यात भारताला विजय मिळाल्याच्या अति उत्साहाने आणि सामना पाहतानाच्या तणावाने गणपत जानू घडशी ( 68 )यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने मृत्यू झाला.

संगमेश्वर - भारत विरूध्द अफगाणिस्तान क्रिकेट सामन्यात भारताला विजय मिळाल्याच्या अति उत्साहाने आणि सामना पाहतानाच्या तणावाने गणपत जानू घडशी ( 68 )यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने मृत्यू झाला. 

आंबव (पोंक्षे )गावचे रहिवासी गणपत घडशी हे क्रिकेट मॅचचे रसिक होते. मुंबईला शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ते गावीच रहात होते. सेवाभावी वृत्तीचे, परोपकारी व मनमिळावू स्वभावामुळे गावात सुपरिचित होते. सेवेत असल्यापासूनच क्रिकेट हा त्यांचा आवडीचा विषय होता. काल (ता.22) रात्री 11 वाजता भारत विरूध्द अफगाणिस्तान सामना रंगला असताना आपण पराभूत होणार या निराशेने ते प्रचंड नाराज होते. 

शेवटच्या ओव्हरला आपल्या गोलंदाजाने चार धावा दिल्याने त्यांनी रागही व्यक्त केला, पण लगेचच पुढे तीन बळी घेत विजय मिळवल्याने ते आराम खुर्चीतून दोन हात वर करत ताड्कन उठले, अरे आपण जिंकलो भारताचा विजय झाला असे मोठयाने ओरडले आणि धाडकन जमिनीवर कोसळणार तेवढ्यात मुलगा मंगेशने त्यांना सावरले. पण त्यांनी शेवटचा श्वास सोडला.

झाल्याप्रकाराने सारेच कुटुंब गोंघळून गेले. त्यांना तातडीने माखजन प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, पण तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले होते. आज दुपारी आंबव घडशी वाडी येथील स्मशानात त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Victims of India-Afghanistan cricket match