रत्नागिरीतील जागा वाटपावरून भाजपची शिवसेनेला गुगली

संदेश सप्रे
Tuesday, 27 August 2019

देवरूख - विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात युतीचे चित्र अस्पष्ट असतानाच  देवरूखातील भाजप मेळाव्यात प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी जिल्ह्यातील पाचपैकी 2 मतदारसंघांवर दावा केला आहे. ही मागणी लावून धरण्याचा इशारा त्यांनी दिल्याने शिवसेनेच्या कोट्यातील एक जागा कमी होणार आहे.  लाड यांनी टाकलेल्या गुगलीवर आता शिवसेना कशी फलंदाजी करते यावर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

देवरूख - विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात युतीचे चित्र अस्पष्ट असतानाच  देवरूखातील भाजप मेळाव्यात प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी जिल्ह्यातील पाचपैकी 2 मतदारसंघांवर दावा केला आहे. ही मागणी लावून धरण्याचा इशारा त्यांनी दिल्याने शिवसेनेच्या कोट्यातील एक जागा कमी होणार आहे.  लाड यांनी टाकलेल्या गुगलीवर आता शिवसेना कशी फलंदाजी करते यावर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

राज्यात लोकसभेला झालेली युती कायम राहणार की नाही याबाबत संभ्रम आहे. राज्यस्तरावर दोन्ही पक्षाचे नेते आमचं ठरलय असे म्हणत असले तरी निवडणूक जवळ येऊ लागली तसतशी दोन्ही पक्षातील कुरबुरी वाढत निघाली आहे. त्यात राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाल्याने युती कायम राहिल्यास कोकणातील जागा वाटपाचा तिढा अडचणीचा होणार आहे.

या सर्वावर कडी म्हणून देवरुखात भाजप प्रदेश उपाध्यक्ष लाड यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपैकी दोन मतदारसंघ भाजपला हवेत अशी जाहीर मागणी केलीच, शिवाय प्रदेश पातळीवर याचा पाठपुरावा करणार असल्याचे सांगत सेनेसमोर गुगली टाकली आहे. सद्यस्थितीत सेनेकडे राजापूर, रत्नागिरी, चिपळूण हे तीन आमदार असून गुहागर आणि दापोली हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहेत. भास्कर जाधव शिवसेनेत येणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे गुहागरचे काय होणार असाही प्रश्‍न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात सात मतदारसंघ असताना गुहागर व रत्नागिरी हे दोन मतदारसंघ भाजपकडे होते. आता पाचपैकी किती मतदारसंघ भाजपला असा प्रश्‍नच आहे. भास्कर जाधवांचे फिस्कटले तर गुहागर हा एकमेव मतदारसंघ भाजपच्या पारड्यात पडू शकतो. त्यामुळे चिपळूण मतदारसंघाची मागणी करून भाजपने नमके काय साधले याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. दोन मतदारसंघाची भाजपची मागणी कशी पूर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

योगेश यांचा प्रबळ दावा
विरोधकांकडील दोन मतदारसंघापैकी दापोलीवर पर्यावरणमंत्री रामदास कदमांचे सुपुत्र योगेश यांनी प्रबळ दावा केला आहे. गेले तीन वर्षे ते या मतदारसंघात जोरदार तयारी करत आहेत. त्यामुळे हा मतदारसंघही भाजपला मिळताना कठीण आहे. त्यामुळे गुहागर हा एकमेव पर्याय भाजपसमोर असणार आहे.
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Allocation of BJP Shivsena Candidates in Ratnagiri special report