Vidhan Sabha 2019 : गीते - जाधवांतील वाद विरघळले भगव्या वातावरणात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

गुहागर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार भास्कर जाधव यांच्या प्रचारासाठी अनंत गीतेंनी मतदारसंघात ठिकठिकाणी सभा घेतल्या. राजकारणात कोणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

चिपळूण - गुहागर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार भास्कर जाधव यांच्या प्रचारासाठी अनंत गीतेंनी मतदारसंघात ठिकठिकाणी सभा घेतल्या. राजकारणात कोणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

जिल्ह्यात शिवसेनेतील अंतर्गत वादळ शांत झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जाधव राष्ट्रवादीत असताना हे दोघे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक होते; मात्र जाधवांनी सेनेत प्रवेश केल्यानंतर दुधात साखर मिसळावी, असे भास्कर जाधव आणि अनंत गीते संघटनेत विरघळून गेल्याचे कार्यकर्त्यांनी पाहिले. 

भास्कर जाधव यांनी शिवसेना सोडली तेव्हा अनंत गीते विरूद्ध भास्कर जाधव असा वाद होता. जाधव राष्ट्रवादीत गेले तेव्हा उदय सामंत, रमेश कदम यांच्याशी त्यांना पक्षांतर्गत युद्ध करावे लागले. तसेच रामदास कदम आणि अनंत गीतेंचाही त्यांना सामना करावा लागला. उदय सामंत यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला.

आघाडीचे सरकार गेले आणि जिल्ह्यातील राजकारण शांत झाले. युती सरकारमध्ये रामदास कदम मंत्री झाले मात्र त्यांना दापोली मतदारसंघातून योगेश कदमला निवडून आणायचे असल्यामुळे त्यांनी अनंत गीते आणि भास्कर जाधव यांच्याशी मैत्रीचे संबंध निर्माण केले. गीतेंच्या मुंबईतील निवासस्थानी कदमांच्या बैठका सुरू झाल्या. लोकसभा निवडणुकीत अनंत गीतेंना दापोली मतदारसंघातून त्यांनी 17 हजाराचे मताधिक्‍क्‍य दिले. त्याठिकाणी गीते विरुद्ध कदम आणि कदम विरुद्ध जाधव हा वाद संपला.

भास्कर जाधवांनी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उदय सामंत यांना जाधवांनी मिठी मारली. तेव्हा जाधव विरुद्ध सामंत वाद संपल्याचे सर्वांनी पाहिले. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर गीते राजकारणापासून अलिप्त होते. मात्र जाधव यांच्यासाठी त्यांनी प्रचारसभा घेतल्या. त्यामुळे गीते विरुद्ध जाधव वाद देखील संपल्याचे पहायला मिळाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan sabha 2019 Anant Gite support Bhaskar Jadav