Vidhan Sabha 2019 : सावंतवाडीची जागा भाजपच लढवणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

सावंतवाडी - शिवसेना - भाजप युती झाली तरीही पक्षाने निर्णय दिल्यास, ही जागा भाजप लढवेल आणि आमदारही भाजपचाच निवडून येईल. तालुकाध्यक्ष म्हणून जो उमेदवार असेल, त्याचे जोमाने काम करू; मात्र उमेदवार हा पक्षश्रेष्ठी ठरवतील, अशी स्पष्टोक्ती भाजप तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी येथे दिली. 

सावंतवाडी - शिवसेना - भाजप युती झाली तरीही पक्षाने निर्णय दिल्यास, ही जागा भाजप लढवेल आणि आमदारही भाजपचाच निवडून येईल. तालुकाध्यक्ष म्हणून जो उमेदवार असेल, त्याचे जोमाने काम करू; मात्र उमेदवार हा पक्षश्रेष्ठी ठरवतील, अशी स्पष्टोक्ती भाजप तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी येथे दिली. 

येथील शहर भाजप कार्यालयात श्री. सांरग यांनी पत्रकात परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष अब्दुल साठी, उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर, शहराध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, तालुका सरचिटणीस महेश धुरी, मिलीन फर्नांडीस, मंदार कल्याणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. सारंग म्हणाले, ""सबका साथ सबका विकास, या भाजपच्या धोरणानुसार सावंतवाडी तालुक्‍यातील अल्पसंख्याकांची तब्बल 13 विकास कामे महाराष्ट्र शासनाने मंजूर केली असून त्यासाठी एक कोटी रूपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ही कामे मंजूर करण्यासाठी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी मेहनत घेतली. ज्याप्रमाणे भाजप अल्पसंख्यांकाच्या मागे उभा आहे, त्याप्रमाणे अल्पसंख्याक जनतेने भाजपच्या पाठिशी ठामपणे उभे राहावे, अशी अपेक्षा आहे. 

अल्पसंख्याकांच्या विकासात या कामांचा समावेश -

 • कोलगाव सेंट थॉमस चर्च परिसरात सुधारणा करणे 
 • कोलगाव निरूखे कब्रस्थान येथे इदगा बांधणे 
 • माजगाव कब्रस्थान संरक्षण भिंत बांधणे
 • कलंबिस्त येथे दफनभुमी सुधारणे
 • आजगाव ख्रिश्‍चनवाडी दफनभुमी सुधारणे
 • आजगाव होलीक्रॉस हॉल सुधारणे
 • सावंतवाडी मुताझिमा कब्रस्थान ट्रस्ट जागेमध्ये मुस्लिम समाज बहुउद्देशिय हॉल उभारणे
 • मिलाग्रीस दफनभुमीत सुधारणा करणे
 • ख्रिश्‍चन धर्मगुरूच्या दफनभुमिची सुधारणा करणे
 • मुस्लिम वेलफेर सोसायटीच्या बाजूच्या बहुउद्देशीय हॉलचे विस्तार करणे
 • भटवाडी येथे आलेडी ऑफ फातिमा प्रेअर हॉल सुधारणा करणे
 • बांदा मुश्‍लिम कब्रस्थान येथे संरक्षण भिंत बांधणे

तेली आमचे नेते 
तालुकाध्यक्ष सारंग यांनी सोशल मीडियावर दिलेल्या एका वृत्तात कबुलायदार गावकर प्रश्‍न हा फक्‍त राज्यमंत्री रविंद्र चव्हाण व ग्रामस्थांमुळे मार्गी लागला असून त्याचे कोणी श्रेय घेऊ नये, असे म्हटले होते; मात्र या प्रश्‍नावर मेहनत घेतलेल्या भाजप प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांचा कुठेच उल्लेख नसल्याने दोघांत मतभेद झाले का ? असा प्रश्‍न सारंग यांना विचारला असता, पक्षात कोणीच कामाचे श्रेय घेत नाही, जसे रविंद्र चव्हाण आमचे नेते आहेत, तसे तेलीही आमचे नेते असल्याचे सांगून अशा अफवांवर कोणी विश्‍वास ठेवू नये, असे त्यांनी नमुद केले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 BJP will contest Sawantwadi seat