Vidhan Sabha 2019 : गुहागरच्या तिढ्याने भाजपमध्ये अस्वस्थता

Vidhan Sabha 2019 : गुहागरच्या तिढ्याने भाजपमध्ये अस्वस्थता

गुहागर - आमदार भास्कर जाधव यांची शिवसेनेतील घरवापसी आणि भाजपच्या गोटातून गुहागरची जागा शिवसेनेला सोडण्याबाबत आलेली बातमी यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. जिल्ह्यातील एक तरी जागा भाजपला मिळालीच पाहिजे यासाठी आता हे कार्यकर्ते एकवटले आहेत. 

प्रदेश भाजपकडून रत्नागिरी जिल्ह्यात एकही जागा भाजपला सुटणार नाही, असे संकेत मुंबईतील सभेत देण्यात आले होते. ही बातमी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेपर्यंत उघड होऊ नये अशाही सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र जिल्ह्यातील उद्विग्न भाजप नेत्यांकडून ही बातमी फुटली. या बातमीने गुहागर तालुक्‍यातील भाजप कार्यकर्ते संतापले होते. काहीजण अजूनही अधिकृत काहीच नाही असे सांगत या कार्यकर्त्यांना शांत करत होते. मात्र त्यामध्येही अस्वस्थता होती. त्याचवेळी दापोलीतील भाजप कार्यकर्ते श्रीराम इदाते यांनी निधीच्या श्रेयावरून पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना लिहिलेले पत्र सोशल मीडियात फिरू लागले.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी दापोलीतील भाजप शिवसेनेसोबत नाही याचेही संदेश फिरू लागले. या सर्व घडामोडींमुळे उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. यावेळी या कार्यकर्त्यांचा शिवसेनेला विरोध नाही. मात्र स्वपक्षाचेच नेते करत असलेला अन्याय सहन होत नाही. एका कार्यकर्त्यांने सांगितले की, पक्षाकडून आमची अशीच बोळवण होणार असेल तर पक्षाला भविष्यात स्थानिक निवडणुकांमध्येही उमेदवार शोधावा लागेल. अस्वस्थ कार्यकर्त्यांनी घरात बसण्याचा निर्णय घेतला तर पक्षाचेच अधिक नुकसान होईल. संघटना महत्त्वाची असली तरी संघटनेचे बळ निवडणुकीतूनच दिसते. कोकणात शिवसेना मजबूत आहे. भाजप मजबूत होण्यासाठी निवडणुकीत आपला उमेदवार असलाच पाहिजे. आजही या पक्ष कार्यकर्त्यांचे लक्ष जागावाटपाकडे लागून राहिले आहे. आमदार भास्कर जाधव चिपळुणातून निवडणूक लढवतील. त्यांच्यासारखा आक्रमक नेता समोर आव्हान असेल तर अधिक जोमाने लढू शकतो.

जाणीव रामदास कदमांना आहे
गुहागरमधून भाजपचा उमेदवारच निवडणूक लढवेल. चिपळूण मतदारसंघात भास्कर जाधवांना डॉ. नातू मदत करतील तर जाधव यांच्या प्रभावाचा नातूंनाही फायदा होईल. लोकसभेतील मतांचा विचार करता दापोलीमधील शिवसेनेची जागाही धोक्‍यात आहे. तेथील भाजपने मदत केली नाही तर नुकसान होईल याची जाणीव रामदास कदमांना आहे, अशी मते भाजपच्या गोटात व्यक्त होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com