Vidhan Sabha 2019 : सावंतवाडीत मनसेची रेडकरांना उमेदवारी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

दोडामार्ग - शिवसेना दोडामार्ग तालुका माजी संपर्कप्रमुख प्रकाश रेडकर यांनी आज कृष्णकुंजवर मनसेमध्ये प्रवेश केला. ते सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार असतील. शिवसेनेवरील नाराजी त्यांनी मनसेत प्रवेश करून व्यक्त केली. 

दोडामार्ग - शिवसेना दोडामार्ग तालुका माजी संपर्कप्रमुख प्रकाश रेडकर यांनी आज कृष्णकुंजवर मनसेमध्ये प्रवेश केला. ते सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार असतील. शिवसेनेवरील नाराजी त्यांनी मनसेत प्रवेश करून व्यक्त केली. 

श्री. रेडकर उसपचे (ता. दोडामार्ग) रहिवासी आहेत. शिवसेनेचे तालुका संपर्कप्रमुख म्हणून ते काम पाहत होते. शिवसेनेतील अनेक वर्षांचे योगदान लक्षात घेऊन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी सावंतवाडीतून उमेदवारी मागितली होती. "मातोश्री'वर त्यांची मुलाखतही झाली होती; मात्र त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता नसल्याने त्यांनी संपर्क प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्याजागी सहसंपर्क प्रमुख केशव धाऊसकर यांना नियुक्ती देण्यात आली.

श्री. ठाकरे यांच्याकडून सावंतवाडीची उमेदवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांना जाहीर होताच त्यांनी अनेक सहकारी, मित्रांसोबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेमध्ये प्रवेश केला. 

काँग्रेस आघाडीकडून उमेदवाराची घोषणा झाली नसली, तरी सावंतवाडी मतदारसंघात आता दीपक केसरकर, भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली आणि प्रकाश रेडकर या शिवसेना भाजपच्याच उमेदवारांमध्ये आमनेसामने लढत होणार आहे. त्यामुळे केसरकर यांची मते घटण्याची शक्‍यता राजकीय मंडळी व्यक्त करत आहेत. 

दोडामार्ग विकास मंडळ रेडकरांच्या पाठीशी? 
दोडामार्ग तालुका विकास मंडळाच्या तालुक्‍यातील चाकरमान्यांच्या व्हॉट्‌सअप ग्रुपवर विधानसभेचा उमेदवार दोडामार्गचाच हवा असा आग्रह धरला जात होता. त्यांनी त्यासाठी रेडकर यांच्या नावाला पसंतीही दिली होती. आता मनसेतून ते निवडणूक लढवत असल्याने ते हक्काच्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याची शक्‍यता आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Prakash Redkar contestant from Manse in Sawantwadi