Vidhan Sabha 2019 :  उद्धव ठाकरेंवरच कारवाई हवी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

वैभववाडी - रत्नागिरी-सिंधुदुर्गातील आठ पैकी कणकवली विधानसभा हा एकमेव मतदारसंघ भाजपच्या वाट्याला असताना तेथे शिवसेनेने एबी फॉर्म देऊन युतीला तडा दिला आहे. त्यामुळे एबी फॉर्म देणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर महायुतीने कारवाई करायला हवी, असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे व्यक्त केले. 

वैभववाडी - रत्नागिरी-सिंधुदुर्गातील आठ पैकी कणकवली विधानसभा हा एकमेव मतदारसंघ भाजपच्या वाट्याला असताना तेथे शिवसेनेने एबी फॉर्म देऊन युतीला तडा दिला आहे. त्यामुळे एबी फॉर्म देणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर महायुतीने कारवाई करायला हवी, असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे व्यक्त केले. 

येथील स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयात जठार यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी सुधीर नकाशे, मंगेश गुरव, दिगंबर मांजरेकर, रत्नकांत कदम आदी उपस्थित होते.

जठार म्हणाले, ""रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ पैकी कणकवली हा एकमेव मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला आहे. तेथे कोण उमेदवार द्यायचा हा आमच्या पक्षाचा प्रश्‍न होता; परंतु शिवसेनेने विश्‍वासघात करीत सतीश सांवतांना एबी फॉर्म दिला. महायुतीला तडा देण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे महायुतीने सर्वात पहिली कारवाई त्यांच्यावर करायला हवी.

कणकवलीतुन सतीश सावंत यांची उमेदवारी ही बेकायदेशीर आहे. वेळ गेलेली नाही. शिवसेनेने अजुनही कणकवलीतून माघार घ्यावी. आम्ही उर्वरित दोन मतदारसंघातून माघार घ्यायला तयार आहोत. सांवतवाडी आणि कुडाळचे भाजप पुरस्कृत उमेदवारांना पाठिंबा दिल्यामुळे त्या उमेदवारांसह मुख्यमंत्री कारवाई करणार आहेत, असा सोशल मीडियावर फिरणारा मेसेज हा फेक आहे. पक्ष माझ्यावर कधीही कारवाई करणार नाही.

- प्रमोद जठार

ते म्हणाले, ""केंद्रीय नेतृत्वाने कणकवली विधानसभा मतदारसंघातून नीतेश राणेंना उमेदवारी दिली आहे. पक्षाने दिलेला आदेश शिरसावंद्य मानून प्रत्येक पदाधिकाऱ्याने काम करणे आवश्‍यक होते; परंतु स्वतःला पक्षाचे पदाधिकारी समजणारे अतुल रावराणे, संदेश पारकर, सभापती लक्ष्मण रावराणे, कणकवलीचे तालुकाध्यक्ष संदेश सांवत हे सूचना करूनही पक्षाच्या विरोधात काम करून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे या चौघांच्या हकालपट्टीचा एकमुखी ठराव जिल्हा कार्यकारिणीत झाला आहे. हा ठराव प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविला आहे. येत्या 15 ऑक्‍टोबरला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड हे दोघे येणार असून त्यावेळी त्या चौघांवर कारवाईचा निर्णय होणार आहे.'' 

पक्षनिष्ठा समजण्याएवढी त्यांची कुवत नाही 
संदेश पारकर आणि अतुल रावराणे यांना पक्षनिष्ठा समजण्याएवढी कुवत नाही.नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाने संदेश पारकरांसाठी अडीच कोटी रुपये खर्च केला तरी देखील ते निवडून येऊ शकले नाहीत. त्यांना अजूनही राजकारण कळत नाही त्यांनी अजूनही मी सांगतो ते ऐकावे असा सल्ला श्री. जठार यांनी श्री. पारकर यांना दिला.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Pramod Jathar comment