Vidhan Sabha 2019 : सिंधुदुर्गमध्ये शिवसेना - भाजपचे दावे - प्रतिदावे

Vidhan Sabha 2019
Vidhan Sabha 2019

ओरोस - सिंधुदुर्गात अकराव्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी काल (ता. 21) मतदान शांततेत पार पडले. राज्यात व केंद्रात युतीचे सरकार आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही शिवसेना - भाजप युती एकमताने राज्यात निवडणुकीला सामोरे गेली; पण सिंधुदुर्ग त्याला अपवाद ठरला. कारण सिंधुदुर्गातील तिन्ही विधानसभा निवडणुकीत शिवसेना - भाजपचेच उमेदवार एकमेकांसमोर तगडे आव्हान देवून उभे होते. त्यामुळे मतदान प्रक्रिया संपल्यानंतर शिवसेना - भाजपच्या उमेदवारांनी आपलाच विजय होणार असे दावे-प्रतिदावे केले आहेत. त्यामुळे यातील कोणाचे दावे खरे ठरतात ? कोणाचे खोटे ठरतात ? हे 24 ला मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

सिंधुदुर्गात प्रत्येक निवडणुकीत एकसंघपणे निवडणुकीला जाणारी युती या निवडणुकीत एकमेकांचे प्रबळ विरोधक दिसली. त्याला कारण माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचा भाजप प्रवेश. शिवसेनेचा राणे यांच्या भाजप प्रवेशाला तीव्र विरोध होता. त्यातच त्यांचे पुत्र व विद्यमान आमदार नितेश राणे यांना भाजपने कणकवलीतून दिलेली उमेदवारी शिवसेनेला रूचली नाही. त्यामुळे शिवसेनेने राणे यांचे अत्यंत जवळचे शिलेदार सतीश सावंत यांना गळाला लावत युती असतानाही पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली. येथेच युतीत ठिणगी पडली.

केंद्र व राज्यात एकत्र असलेली शिवसेना-भाजप राजकीय विरोधक बनली. त्यामुळे सावंतवाडीमध्ये भाजपमधून बंडखोरी करीत उमेदवारी दाखल केलेल्या राजन तेली व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून कुडाळमध्ये अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांना भाजपने पुरस्कृत केले. त्यांच्यासाठी आपली सर्व ताकद पणाला लावली.

कणकवलीत शिवसेनेने सुद्धा सतीश सावंत यांच्यासाठी सर्व ताकद लावली. त्यामुळे तिन्ही मतदार संघ युतीतील एकमेकांच्या विरोधी प्रचाराने गाजले. ढवळून निघाले. फोडाफोडीचे राजकारण झाले. यावेळी मतदारांच्या मिळालेल्या प्रतिसादाच्या जोरावर सर्व उमेदवारांना आपणच विजयी होणार असल्याचा आत्मविश्‍वास आहे.

दरम्यान जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना आपणच विजयी होणार असल्याचा विश्‍वास एकीकडे असताना सिंधुदुर्गात मात्र याचवेळी दोन विभिन्न राजकीय चर्चा सुरु आहेत. त्या म्हणजे कोण कोणाला क्‍लीन स्वीप देणार ? सिंधुदुर्गात राणेंचे साम्राज्य संपवणार असा दावा करत शिवसेनेने भाजपची अधिकृत जागा असतानाही कणकवलीत आपला एबी फॉर्म देवून सतीश सावंत यांना रिंगणात उतरविले.

भाजपने राणे कुटुंब सोडून कोणालाही उमेदवारी दिली तर शिवसेनेचा पाठिंबा राहील. अन्यथा शिवसेना उमेदवार देणार, अशी भूमिका घेतली. भाजपनेही नंतर भाजपने कोणाला उमेदवारी द्यायची, हे शिवसेनेने ठरवू नये असे जाहीर केले; मात्र या भानगडीत शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांना एकमेकांना क्‍लीन स्वीपची स्वप्ने पडू लागली आहेत.

शिवसेना म्हणते तिन्ही जागी आमचाच उमेदवार विजयी होणार. भाजप सुद्धा तीच स्वप्ने पाहत असून तिन्ही जागांवर भाजप उमेदवार विजयी होतील, असा त्यांना विश्‍वास वाटत आहे. त्यामुळे नेमके कोण क्‍लीन स्वीप होते ? हे 24 लाच स्पष्ट होणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com