Vidhan Sabha 2019 : कणकवली मतदारसंघातील राजकीय गूढ कायम 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

कणकवली - विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असले, तरी कणकवली मतदारसंघातील राजकीय गूढ कायम राहिले आहे.

कणकवली - विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असले, तरी कणकवली मतदारसंघातील राजकीय गूढ कायम राहिले आहे.

कणकवलीतील राजकीय मंडळींनी मुंबईला मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे शिवसेनेकडून सतीश सावंत यांना, तर नीतेश राणे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार का ? याबाबतची चर्चा आज होती. राणेंचा भाजप प्रवेश लांबल्याने त्यांची पुढील राजकीय दिशा काय ? असाही प्रश्‍न स्वाभिमान कार्यकर्त्यांना सतावत होता. 

कणकवली मतदारसंघ हा भाजपच्या वाट्याला आहे. या मतदारसंघातून भाजपकडून संदेश पारकर हे प्रबळ दावेदार आहेत; मात्र विद्यमान आमदार नीतेश राणे यांना भाजपने एबी फॉर्म दिल्याची चर्चा विविध वृत्तवाहिन्यांतून होती. भाजपच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी त्याबाबत बोलण्यास नकार दिला. आजचा राणेंचा भाजप प्रवेशदेखील लांबला. त्यामुळे नीतेश राणेंच्या भाजप उमेदवारीबाबतही संभ्रमावस्था कायम राहिली. 

राणेंचे खंदे समर्थक आणि जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी राणेंपासून फारकत घेत स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला. आता सतीश सावंत हे कणकवलीमधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असतील अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होती. श्री. सावंत हे "मातोश्री'वर असल्याचेही विविध राजकीय नेतेमंडळींकडून सांगितले जात होते. त्यामुळे कणकवली मतदारसंघातील राजकीय गोंधळ आज कायम राहिला होता.

दरम्यान, आमदार नीतेश राणे यांनी "आता शेवटचे काही तास' असे ट्‌विट केले होते. त्यामुळे ते वेगळा निर्णय घेतात का? याचीही उत्सुकता स्वाभिमान कार्यकर्त्यांसह जिल्हावासीयांना होती. 

कणकवलीतून राणे यांनाच उमेदवारी ? 
कणकवली मतदारसंघातून नीतेश राणे यांनाच भाजपकडून उमेदवारी निश्‍चित झाल्याचा पुनरुच्चार आज भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केला. शुक्रवारी (ता.4) ते उमेदवारी अर्ज दाखल करतील अशीही माहिती त्यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha 2019 Kankavali Assembly Constituency