Vidhansabha2019 : ...तर कुडाळमध्ये शिवसेनेसमोर कडवे आव्हान 

Vidhansabha2019 : ...तर कुडाळमध्ये शिवसेनेसमोर कडवे आव्हान 

कुडाळ - शिवसेना विरूद्ध नारायण राणे, असा कडवा संघर्ष असलेला मतदारसंघ म्हणजे कुडाळ - मालवण. राज्यात पाच वर्षे सत्तेत असूनही भाजप येथे फारशी ताकद निर्माण करू शकला नाही. राणे भाजपवासी झाले तर शिवसेनेसमोरचे आव्हान कडवे होणार आहे. अर्थात शिवसेनेच्या वैभव नाईक यांच्यासमोर उमेदवार कोण असणार? यावर जय - पराजयाची गणिते ठरणार आहेत. 

पूर्वीच्या वेंगुर्ले मतदारसंघातील कुडाळ आणि कणकवली व मालवण तालुका मिळून कुडाळ मतदारसंघ झाला आहे. पुर्वरचनेनंतरची यंदा होणारी तिसरी निवडणूक असेल. 2014 मध्ये येथील लढत आणि निकाल "हाय व्होल्टेज' ठरला. कारण या मतदारसंघाने माजी मुख्यमंत्री राणे यांना पराभव दाखवला. शिवसेनेचे वैभव नाईक निवडून आले. दुसऱ्या टर्मसाठी नाईक सज्ज झाले आहेत. शिस्तबद्ध मोर्चेबांधणी करणारा नेता, अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद असले तरी गेल्या पाच वर्षात त्यांनी आपल्याच मतदारसंघाकडे पूर्ण लक्ष केंद्रीत केले होते. या आधीचे आमदार राणे यांचा विमानतळ, सी वर्ल्ड आदी मोठ्या प्रकल्पांवर भर असायचा.

नाईक यांनी वाडी वस्त्यांवरील छोट्या-छोट्या कामांना प्राधान्य दिले. प्रत्येक गावात-वाडीत एक तरी काम होईल असा प्रयत्न केला. संवेदनशील विषय मुत्सद्दीपणे हाताळले. आताही चतुर्थी आधीच त्यांचा कार्य अहवाल, गणेशोत्सव भेट जवळपास प्रत्येक घरात पोहोचली आहे. यावरून त्यांनी किती भक्‍कम नेटवर्क निर्माण केले याचा अंदाज येतो. 

येथे शिवसेनेसमोर मुख्य आव्हान राणेंचे आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांची फळी आजही मजबूत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ताकद आहे. तुलनेत भाजपला मात्र फारशी ताकद निर्माण करता आली नाही. आताही राणे भाजपवासी झाले व युती तुटली तर येथे तुल्यबळ लढत अपेक्षीत आहे. अर्थात भाजपकडून उमेदवार कोण असेल? यावरही बरीच गणिते अवलंबून असणार आहेत. राणे भाजपमध्ये असले तर इथल्या उमेदवार त्यांच्याच मर्जीतील असणार आहे.

सतिश सावंत, दत्ता सामंत की डाॅ. नीलेश राणे

येथून स्वाभिमानतर्फे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतिश सावंत आणि स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत इच्छूक आहेत. या दोन्ही इच्छुकांची स्वतःची ताकद आहे. स्वतः राणे येथून उमेदवार असल्यास अंतर्गत नाराजीचा प्रश्‍न येणार नाही; मात्र तसे न झाल्यास उमेदवारी कोणाला द्यायची? हा प्रश्‍न आहे. सावंत आणि सामंत यांच्यापैकी कोणीही उमेदवार असला तरी दुसऱ्या इच्छुकांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. यातच राणे यांनी एका वृत्त वाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत स्वतः दिल्लीत व नीतेश आणि नीलेश यांना विधानसभेत पाठवणार असल्याचे संकेत दिले आहेत. तसे झाल्यास येथून डॉ. नीलेश राणे हे उमेदवार असतील. 

अतुल काळसेकर यांचेही नाव चर्चेत

भाजप शिस्तीने चालणारा पक्ष आहे. येथे पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम मानला जातो. कुडाळच्या उमेदवार निर्णय प्रक्रीयेत राणेंची भूमिका महत्त्वाची असली तरी ऐनवेळी मूळ भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दावा केला तरी प्रश्‍न निर्माण होवू शकतो. गेल्यावेळी येथून बाबा मोंडकर यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी अतुल काळसेकर यांचेही नाव चर्चेत होते. एकूणच शिवसेनेला टक्‍कर द्यायची असेल तर भाजप किंवा राणेंना पक्षांतर्गत नाराजी, बंडखोरी किंवा पक्षांतर टाळावे लागणार आहे. यातून जुळणाऱ्या समीकरणावरच येथील चुरस अवलंबून असणार आहे. युती झाली नाही तर शिवसेना-भाजपातच मुख्य लढत असेल. आघाडीच्या जागा वाटपातही जागा काँग्रेसकडे जाते. सध्या तरी या दोन पक्षांना तुल्यबळ लढत देईल, असा उमेदवार त्यांच्याकडे नाही. यामुळे युती तुटली तर येथे दुरंगी लढत अपेक्षीत आहे. 

सार्वत्रिक लढतीतील विजयी उमेदवार 
* 1972 - वेंगुर्ले - सीताराम देसाई (कॉंग्रेस), मालवण - गोपाळराव वि. प्रभुगावकर (कॉंग्रेस) 
* 1978 - वेंगुर्ले - पुंडलिक किनळेकर (जनता दल), मालवण - डॉ. यशवंत बाबाजी दळवी (जनता दल) 
* 1980 - वेंगुर्ले - एस. एन. देसाई (कॉंग्रेस-आय), मालवण - केशवराव राणे (कॉंग्रेस आय) 
* 1985 - वेंगुर्ले - पुष्पसेन सावंत (जनता दल), मालवण - बापूसाहेब प्रभूगावकर (इं. नॅ. कॉंग्रेस) 
* 1990 - वेंगुर्ले - पुष्पसेन सावंत (जनता दल), मालवण - नारायण राणे (शिवसेना) 
* 1995 - वेंगुर्ले - शंकर कांबळी (शिवसेना), मालवण - नारायण राणे (शिवसेना) 
* 1999 - वेंगुर्ले - शंकर कांबळी (शिवसेना), मालवण - नारायण राणे (शिवसेना) 
* 2004 - वेंगुर्ले - शंकर कांबळी (शिवसेना), मालवण - नारायण राणे (शिवसेना) 
* 2001 - कुडाळ - नारायण राणे (कॉंग्रेस) 
* 2014 - कुडाळ - वैभव नाईक (शिवसेना) 

2014 मधील बलाबल 
* वैभव नाईक (शिवसेना) - 70582 
* नारायण राणे (कॉंग्रेस) - 60206 
* बाबा मोंडकर (भाजप) - 4819 
* पुष्पसेन सावंत (राष्ट्रवादी) - 2692 
* स्नेहा केरकर (अपक्ष) - 747 
* रविंद्र कसालकर (बसप) - 1071  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com