esakal | 'हे' गाव चालविण्याची जबाबदारी दरवर्षी मिळते तिघांना; इथे आजही कबुलायतदार गावकर व्यवस्था
sakal

बोलून बातमी शोधा

village cart of Chukul in Sindhudurg district and the man centered per

गावकी जपणारे गाव

ग्रामस्थांसह गावविकासाची "गावकी'

'हे' गाव चालविण्याची जबाबदारी दरवर्षी मिळते तिघांना; इथे आजही कबुलायतदार गावकर व्यवस्था

sakal_logo
By
शिवप्रसाद देसाई

सिंधुदुर्ग : मंगळवार उजडतो. दुपारी गावातील प्रत्येक कुटुंबातील एक-दोघांची पावले सातेरी मंदिराकडे वळतात. त्यात महिलाही असतात. तेथे गावकी भरते. त्यात विकासाच्या विणेचे तरंग उमटतात. त्यातील न्याय झंकार पकडले जातात आणि भविष्यातील विकासाचा नाद पुढे नेला जातो. हे गुंजन शेकडो वर्षे सुरूच नव्हे, तर समृद्धही होते आहे. हा निखळ निर्झर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकुळच्या गावगाड्याचा आणि माणूसकेंद्रीत दरडोई सुबत्तेचा.
 

राजे गेले, संस्थानिक गेले, सरकार आले; पण त्या गावचा गावगाडा लोकच चालवताहेत. पिढ्यान्‌पिढ्या जपलेली त्यांची स्वतःची व्यवस्था आहे. आणि त्यावर आजही गावकऱ्यांची गाढ श्रद्धा आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चौकुळने जपलेली ही कबुलायतदार गावकर व्यवस्था आजही या गावाला एकतेच्या घट्ट बंधात गुंफून आहे.


चौकुळ सह्याद्रीच्या रांगेत, आंबोलीच्या शेजारी वसलेले देखणे गाव. सैनिकांचे गाव अशीही याची ओळख; पण त्याहीपेक्षा शेकडो वर्षांपासून या गावाने स्वतःची अशी व्यवस्था राखली आहे. येथील प्रत्येक निर्णय गावकरी एकत्र येऊन घेतात. यासाठी दर आठवड्याला गावची बैठक होते. यात तंटे सोडविण्याबरोबरच शेतमजुरीचे दर, औताचे दर, चराई क्षेत्र, शेतीचे क्षेत्र, विकासकामांचे निर्णय, इतकेच काय तर कोणी कुठे घर बांधायचे याचे निर्णयही सर्वसंमतीने घेतले जातात. गावकी नावाने ओळखली जाणारी ही सभा दर मंगळवारी भरते. या सगळ्या व्यवस्थेला कबुलायतदार गावकर म्हणून ओळखले जाते.


हेही वाचा- खरा पुरूष असशील तर राजीनामा दे आणि बाजुला हो ; निलेश राणेंनी कोणाला दिले आव्हान


हे गाव मूळचे गावडे घराण्याचे. भिरवंडे (ता. कणकवली) येथून या घराण्यातील तिघे भाऊ चौकुळमध्ये आले. त्यांनी गाव वसविले. शेतसारा जमा करण्यासाठी येथे खोती पद्धत रूढ झाली. गाव वसणाऱ्या तिघांच्या घराण्यातून तिघे खोत नेमले गेले. त्यांना शेतसारा जमा करण्याची इतरांनी कबुली दिली म्हणून ते कबुलायतदार गावकर झाले. यातूनच गाव चालविण्याची व्यवस्था ठरवली गेली.


गाव चालविण्याची जबाबदारी दरवर्षी रोटेशन पद्धतीने तिघांकडे सोपवली जाते. हे तिघे गावडे घराण्याच्या मूळ तीन कुटुंबातील वंशज असतात. दरवर्षी प्रमुख बदलत असल्याने एकाधिकारशाही राहत नाही. दर मंगळवारी भरणारी गावसभा अर्थात गावकी हा या व्यवस्थेचा आत्मा. येथे साप्ताहिक सुटी दर मंगळवारी असते. या दिवशी गावच्या सातेरी मंदिरात गावकी भरते. इथला कोरम कायम "फुल्ल' असतो. बारा वाड्या आणि एक गावठाण मिळून बसलेल्या दहा किलोमीटर विस्ताराच्या या गावाविषयीचा प्रत्येक निर्णय येथे होतो.

हेही वाचा-Good News : कोकणकर यंदा भातलागवडीत झाली वाढ, वाचा -

ही केवळ न्यायसभा नसते, तर इथे गावाविषयीची धोरणे ठरतात. यात कबुलायदार गावकर प्रमुख असले तरी निर्णय गावातील प्रमुख ग्रामस्थ, ज्येष्ठ एकमताने घेतात. एखादा तंटा झाला तर तो सोडविला जातो. यात दोन्ही पक्षांना म्हणणे मांडण्याची समान संधी मिळते. इतक्‍यावरच न थांबता शेतमजुरीचे दर, लग्नासाठीच्या विविध कामांचे दर, कोणी कुठे शेती करायची, घर कुठे बांधायचे, एखादे विकासकाम कसे करायचे असे गावाशी संबंधित सगळे निर्णय येथे होतात. विशेष म्हणजे यात प्रत्येकाच्या म्हणण्याचा, मताचा विचार केला जातो. 


येथे अनेक वर्षे चराई बंदी क्षेत्र राखले जात आहे. चारा यायला लागला की कबुलायतदार गावकर चराई बंदीचे क्षेत्र निश्‍चित करतात. याला आखाडा म्हणतात. नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत चारा कापून झाल्यावरच येथील चराईबंदी उठवली जाते. येथे कुऱ्हाड बंदीही अनेक पिढ्यांपासून आहे. त्याचे क्षेत्र निश्‍चित केले जाते. दरवर्षी नागली शेतीचे ठिकाण ठरवून तेथे कुऱ्हाडबंदी उठवली जाते. याचे निर्णयही या "गावकी'मध्ये होतात. पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या या व्यवस्थेमुळे या गावाची रचना शिस्तबद्ध आहे. येथे इतर गावांच्या तुलनेत कित्येक पटींनी घट्ट अशी एकी आहे. याच जोरावर हे गाव आता ग्रामपर्यटनात वेगाने प्रगती करीत आहे.


""चौकुळ गावाने अनेक वर्षांपासून शिस्त, ऐक्‍य जपले आहे. नवी पिढीही कबुलायदार गावकर व्यवस्थेवर विश्‍वास ठेवते; कारण येथे सर्वांना विचारात घेऊन सर्वसमावेशक धोरणे ठरतात. अगदी गावविकासाचे अंदाजपत्रकही यात ठरते. याचा आम्हाला अभिमान आहे.''
- गुलाबराव गावडे, माजी सरपंच, चौकुळ

सरकारी शहाणपणा

राज्यात 2007 मध्ये तंटामुक्‍ती मोहीम जाहीर झाली. तंटे गावपातळीवरच मिटत असल्याने पहिले बक्षीस चौकुळला मिळणार, अशी खात्री गावकरी आणि अधिकाऱ्यांनाही होती. मूल्यमापनही झाले; पण चौकुळला बक्षीस मिळाले नाही. याचे कारण म्हणजे गावातून पोलिस ठाण्यात एकही तक्रार नोंदवली गेली नव्हती. त्यानंतर मात्र "सरकारी शहाणपणा' चौकुळवासीयांना समजला. पुढच्या वर्षीपासून मुद्दामहून तीन-चार तक्रारी पोलिसांकडे नोंदवून त्या गावपातळीवर मिटविल्या जाऊ लागल्या.

संपादन - अर्चना बनगे
 

loading image
go to top